सोलापुरात भाजपाची बुलेट ट्रेन
एमआयएम इनोव्हा, शिंदे सेना नॅनो,काँग्रेस डबलसीट, अजीतदादा एकला चलो रे 2029 पर्यंत देशात विरोधी पक्ष "झिरो टॉलरन्स" करण्याचे भाजपाचे मिशन काँग्रेस, शरद पवारांची परंपरागत जहाँगिरी संपुष्टात,मविआच्या अक्षरश: ठिकर्या, शरद पवार, माकपा, उबाठा, मनसेचा भोपळा
(विजयकुमार पिसे)
सोलापूर महापालिका निवडणुकीत 75 पार चा नारा देणार्या भाजपाने तब्बल 87 जागा फटकावून बुलेट ट्रेन चालवली. मतदारांनी काँग्रेस आणि शरद पवारांची परंपरागत जहाँगिरी संपवून टाकली. बारामतीकर पवारांना खाते देखील उघडता आले नाही. अशीच गत माकपा, उबाठा आणि मनसेचीही झाली. ठाकरेंची ना मशाल पेटली, ना राज ठाकरेंचे इंजिन पुढे सरकले. तर माकपाच्या लाल बावट्याने पांढरे निशान फडकावले. काँग्रेस फक्त दोन जागा कशाबशा जिंकत डबलसीटवर बसली. शिंदे सेनेने एकच चौकार मारला. बाकी सब क्लीन बोल्ड. एमआयएमने चमत्कार करीत आठ जागा जिंकल्या. तोच पक्ष प्रमुख विरोधी पक्ष ठरला आहे.
गत वेळी 49 जागा जिंकणार्या भाजपाने यंदा सर्व 102 जागा लढवून 75 पार चा नारा दिला होता.एक्झीट पोलचा अंदाज 60 ते 65 होता, मतदारांनी "पोल ला एक्झीट" करून विक्रमी 87 जागा जिंकल्या. विरोधकांचा सुफडा साफ केला. 2029 पर्यंत देशात विरोधी पक्ष "झिरो टॉलरन्ट" करण्याचे भाजपाचे मिशन आहे. त्याची सुरवात सोलापूर मनपाची ही निवडणूक म्हणता येईल.
सर्व विरोधी पक्षांना फक्त 15 जागा मिळाल्या. सभागृहात विरोधी पक्ष केवळ नावाला राहिला. विरोधी पक्षांपैकी शिंदे सेना व अजीतदादा महायुतीमधील घटक पक्ष आहेत, यामध्ये शिंदे सेनेने चार जागा जिंकल्या, अजीत पवारांच्या पक्षाला एकमेव जागा मिळाली. एमआयएमने बिहारप्रमाणे इथेही कमाल केली. बलाढ्य काँग्रेस आणि शरद पवारांमागे खेचत आठ जागांसह प्रमुख विरोधी पक्ष म्हणून दिमाखात बसणार आहे.
15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 रोजी सात ठिकाणी सोलापूर महापालिकेसाठी मतमोजणी घेण्यात आली. पहिल्या निकालापासून (प्रभाग क्र. 1) आणि शेवटच्या निकाला पर्यंत (प्र.क्र.26)भाजपाने विरोधकांना कुठेच उसंत दिली नाही. गतवेळी (2017) पेक्षा 7 टक्के मतदानात घट याचा अर्थ सत्ताधारी पक्षावर नाराजी असे मानले जाते. अशा नाराजीचा ओरखडा कुठेही जाणवला नाही. मतदारांनी अगदी भरभरून देत अपेक्षापेक्षा अधिक़ जागा पदरात टाकल्या. कमळाचे फूल चिखलात उगवते, इथे भाजपाच्या कमळाने विरोधकांचा "किचड" केला.
दिग्गजांना कमल का किचड
या निवडणुकीत दिग्गज नेत्यांपैकी माजी महापौर असलेले मनोहर सपाटे,यू.एन.बेरिया, आरिफ शेख, संजय हेमगड्डी, अलका राठोड यांचे पानिपत झाले. काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे जेमतेम 262 इतके मताधिक्य घेत विजयी झाले. त्यांच्या प्र.15 मधील अन्य तीन सहकारी पराभूत झाले. माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, नाना काळे, राजेश काळे, राजेंद्र कलंत्री, यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय माजी सभागृह नेते सुरेश पाटील, श्रीनिवास करली, मधुकर आठवले, माजी गटनेते आनंद चंदनशिवे आणि पत्नी कविता, तौफीक शेख, शिवा कांबळे बाटलीवाला, नागेश ताकमोेगे, रवींद्र गायकवाड, बबलू गायकवाड, सिध्दाराम चाकोते, मनोज शेजवाल, दत्तू बंदपट्टे, फिरदोस पटेल,नरसिंग कोळी,रियाज खरादी,रियाज हुंडेकरी, भीमाशंकर म्हेत्रे, लक्ष्मणकाका जाधव, रवीकुमार यलगुलवार, रमेश व्हटकर, माजी मंत्री उत्तमप्रकश खंदारे यांची कन्या पूजा खंदारे,गणेश पुजारी, अॅड.सुरेश गायकवाड, अंबादास करगुळे,गाझी जहागिरदार, इब्राहिम कुरेशी, नलिनी कलबुर्गी,सुनीता रोटे, विठ्ठल कोटा, यांचा पराजय झाला.
अपयशी बरडे परिवार
सेनेचे पुरुषोत्तम बरडे कन्या उत्तरा बचुटे या दिग्गजांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. सीए सुशील बंदपट्टे यांची अंदरबाहर नीती घातक ठरली. याठिकाणी काँग्रेसचेच सीए विनोद भोसले विजयी झाले. बरडे परिवार 2002 पासून निवडणूक़ लढवते, आजतागयत एकदाही त्यांना, त्यांच्या सदस्यांना यश आले नाही. यावेळी बरडे परिवाराने भाजपकडून कौल मागितला.
माजी महापौर श्रीकांचना यन्नम, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, संजय कोळी, डॉ.किरण बनसोडे, नरेंद्र काळे,प्रा.नारायण बनसोडे,अनंत जाधव,गणेश वानकर, मेघनाथ येमूल,प्रथमेश कोठे, विनायक कोंड्याल,रवी कैय्यावाले,बसवराज केंगनाळकर, किसन जाधव,वैभव हत्तुरे आणि जयकुमार माने यांनी विरोधकांपुढे हार मानली नाही.
वैभव हत्तुरे जायंट किलर
वैभव हत्तुरे मूळचे भाजपाचे त्यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी भाजप इनकमिंग नागेश ताकमोगे यांचा अनपेक्षित पराभव करून जायंट किलर ठरले. सेनेचे प्रियदर्शन साठे यांनीही इनकमिंग दिलीप कोल्हे यांचा पराजय करून असाच कित्ता गिरवला. हत्तुरे अजीतदादा गटाचे एकमेव शिलेदार ठरले.
हे नवीन चेहरे
सर्वात कमी वयाचे सात्विक बडवे सह गौतम कसबे, पूनम काशीद,स्वाती बडगू, रंजीता चाकोते, ऐश्वर्या साखरे,समाधान आवळे,अलका भंवर,सुनील खटके,अनिकेत पिसे,श्रध्दा किरण पवार, राजकुमार पाटील, मनोरमा ज्ञानेश्वर सपाटे, गीता गवई,बबिता धुम्मा,शेखर इगे,प्रवीण दर्गोपाटील, कादंबरी मंजेली, सतीश शिरसिल्ला,अजय पोन्नम, सत्यनारायण गुर्रम, सारिका खजुरगी, श्रीनिवास कोंडी, कलावती गदगे,विजय चिप्पा,नरसिंह आसादे, निर्मला जंगम, प्रशांत पल्ली, राजश्री दोडमनी, कविता गज्जम, संगीता शिवाजी जाधव, मंजिरी किल्लेदार,चैत्राली गायकवाड, सत्यजीत वाघमोडे,ज्ञानेश्वरी देवकर, दीपक जमादार, वैशाली भोपळे,शिवाजी वाघमोडे हे नवीन चेहरे सभागृहात आले आहेत.
त्रिमूर्तींची यशस्वी रणनीती
भाजपाची रणनीती ठरवणारे त्रिमूर्ती पालकमंत्री जयकुमार गोरे, आ.देवेंद्र कोठे आणि आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी विरोधकांची धोबीपछाड करीत यशस्वीतेची मोहोर उमटविली. आ.विजयकुमार देशमुख आणि आ.सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांना संधी ही रणनीती आखत निवडणुकीत अधिकाधिक उमेदवारी कार्यकर्त्यांनाच देण्याचा केलेला प्रयत्न देखील यशस्वी ठरला. खा.प्रणिती शिंदे, महेश गादेकर,संतोष पवार, अजय दासरी, पठाण यांना कुठेच सूर गवसला नाही. भाजपासमोर त्यांनी नांगी टाकली.
इथे क्रॉस व्होटिंग
प्र.7,25,15,16 इथे क्रॉस व्होटिंग झाले.भाजपच्या श्रध्दा पवार,वैभव हत्तुरे,प्रियदर्शन साठे, चेतन नरोटे विजयी ठरले. असाच प्रकार प्र.10 सतीश शिरसिल्ला व प्र.12 सिध्देश्वर कमटम यांचे बाबतीत होता, अशी चर्चा होती.
What's Your Reaction?





