अशोक सिंघल यांनी हिंदू समाजात जागवला स्वाभिमानाचा हुंकार : आलोक कुमार
पुण्यात स्व.अशोक जी सिंघल जन्मशताब्दी निमित्त विहिंपचे हिंदू समरसता संगम, १०५१ पंच पारंपरिक वाद्यांचा विश्वविक्रम, हिंदू बोध विशेषांकाचे प्रकाशन
पुणे, : गर्व से कहो हम हिंदू हैं या घोषणेतून हिंदू समाजात स्वाभिमान जागविण्याबरोबरच अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचे बळ देण्याचे काम अशोक सिंघल यांनी केले. रामजन्मभूमी मंदिर आंदोलनाच्या माध्यमातून सिंघल यांनी हिंदू समाजाला संघटित करून विजयाचा आत्मविश्वास निर्माण केला. हिंदू समाजाच्या पुनरुत्थानामध्ये त्यांचे योगदान ऐतिहासिक असून, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक समरसतेचा विचार अधिक व्यापक करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अॅड. आलोक कुमार जी यांनी केले.
विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत अध्यक्ष श्रध्देय अशोक जी सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने पुणे येथे हिंदू समरसता संगमचे आयोजन केले होते. यावेळी आलोक कुमार जी यांनी स्व.सिंघल यांच्या कार्याचा आढावा घेत रामजन्मभूमी आंदोलनातील त्यांच्या नेतृत्वाचे स्मरण केले.
याप्रसंगी आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज, प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, श्रीमंत छत्रपती वृशाली राजे भोसले, महापौर मंजुषा नागपुरे, पुरुषोत्तम महाराज देहूकर, योगीराज गोसावी महाराज, प्रांत अध्यक्ष प्रा. गजानन धरणे, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, स्वागत समिती अध्यक्ष अॅड.एस.के.जैन यांच्यासह संत महंत तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावर उपस्थित होती.
रामजन्मभूमी आंदोलनातील संघर्षाचा उल्लेख करताना आलोक कुमार म्हणाले की, 30 ऑक्टोबर 1990 रोजी अयोध्येत कारसेवेचे आवाहन करण्यात आले होते. तत्कालीन सरकारने कारसेवा रोखण्यासाठी कठोर निर्बंध होते. रस्ते आणि रेल्वे वाहतुकही रोखली होती. अयोध्येत सुरक्षा व्यवस्था कडक होती. अशा प्रतिकूल परिस्थितीतही कारसेवकांनी अयोध्येत पोहोचण्याचे आव्हान स्वीकारले. या संघर्षादरम्यान अशोक जी सिंघल यांनी जखमी अवस्थेतही आपले प्रयत्न सुरू ठेवले. त्यांच्या नेतृत्वामुळे कारसेवकांमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण झाला.
अशोक जी सिंघल यांचे कार्य केवळ रामजन्मभूमी आंदोलनापुरते मर्यादित नव्हते. हिंदू समाजाला आपल्या सांस्कृतिक अस्मितेची जाणीव करून देणे, समाजातील स्वाभिमान जागविणे आणि विविध घटकांना संघटित करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. गर्व से कहो हम हिंदू है या घोषणेने हिंदू समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले.
रामजन्मभूमी आंदोलनाला व्यापक जनसमर्थन मिळवून देण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती, असेही आलोक कुमार म्हणाले. हिंदू समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे आणि त्यांच्यातील परस्परविश्वास दृढ करणे, ही आजच्या काळातील महत्त्वाची गरज आहे. समाजातील भेद दूर करून बंधुभाव वाढविण्यासाठी सामाजिक समरसतेचा विचार कृतीत उतरविणे आवश्यक आहे. अशोक सिंघल यांच्या जीवनकार्याने दिलेली प्रेरणा पुढे नेत समाज संघटित करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे आवाहनही आलोक कुमार यांनी यावेळी केले.
सिंघल यांचे कार्य धर्म रक्षणासाठी समर्पित
स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी, स्व.सिंघल यांचे विचार आणि त्यांचे कार्य हिंदू समाजासाठी एक शक्तीशाली प्रेरणा आहे. त्यांचा जन्म झाला, तेव्हा रा.स्व.संघाची स्थापना झाली. त्यांचे जीवन व कार्य हिंदू धर्माच्या रक्षणासाठी समर्पित होते. त्यांच्या नेतृत्वाखाली रामजन्मभूमी आंदोलन यशस्वी झाले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे बजरंग दलाची स्थापना झाली. रामजानकी रथयात्रेचे संरक्षणही झाले. त्यांचे धैर्य आणि संघटन कौशल्य रामजन्मभूमी आंदोलन यशस्वी झाले.
युवा पिढीला इतिहासाची ओळख करून द्या.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी अशोक सिंघल यांच्या कार्याचा गौरव करताना, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात केवळ कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आजच्या तरुण पिढीला देशाच्या इतिहासाची आणि राष्ट्रनिर्माणातील योगदानाची ओळख करून देणे आवश्यक आहे. त्यांना हिंदुत्वाच्या विचारांशी जोडून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी करून घेण्याची जबाबदारी बजरंग दल, दुर्गावाहिनी आणि समाजातील सर्व घटकांनी पार पाडावी, असे नानासाहेब जाधव यांनी व्यक्त केले.
अशोक सिंघल यांच्या योगदानाचे स्मरण
अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित हिंदू समरसता संगमातून त्यांच्या नेतृत्वाचे आणि रामजन्मभूमी मंदिर आंदोलनातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. हिंदू समाजाच्या संघटनासाठी त्यांनी केलेले कार्य आणि समाजात स्वाभिमानाची भावना जागृत करण्यासाठी दिलेले योगदान या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा सन्मान प्रांत अध्यक्ष गजानन धरणे, स्वागत अध्यक्ष अॅड.एस.के.जैन, उपाध्यक्षा माधवी सौंशी, प्रांत सहमंत्री नितीन वाटकर, निधी प्रमुख धनाजी शिंदे, मातृशक्ती संयोजिका प्रिया रसाळ, दुर्गा वाहिनी संयोजिका सोनाली नाथ यांनी केले. सूत्रसंचालन व आभार संतोष अनगोळकर यांनी केले. कार्यक्रम व्यवस्था सहप्रमुख करण घोडके व श्रीकांत चिल्लाळ, दिनेश लाड आदी उपस्थित होते.
१०५१ पंच पारंपरिक वाद्यांचा विश्वविक्रम
पंच पारंपरिक वाद्य वादनाचा विश्व विक्रम या कार्यक्रमानिमित्त साकार झाला. 500 शंख, 300 ढोल ताशा, 100 टाळ, 100 पखवाज, 50 संबळ आणि 1 बासरी अशा 1051 वाद्यांचा समावेश होता. पद्मश्री ए. शिवमणी गणेश कला क्रीडा मंचाच्या प्रांगणात हा विक्रम झाला. याचे नियोजन बजरंग दल प्रांत संयोजक नितीन महाजन यांनी केले. तसेच बजरंग दल, दुर्गा वाहिनी, मातृशक्ती यांची विराट शोभायात्रा पुणे शहरात प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली.
हिंदू बोध विशेषांकाचे प्रकाशन
श्रध्देय अशोक जी सिंघल जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित मासिक हिंदू बोधचा विशेषांक यावेळी काढण्यात आला. या विशेषांकाचे विमोचन उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी संपादक श्रीपाद रामदासी, प्रक़ाशक विजयकुमार पिसे, प्रचार प्रसार प्रांत प्रमुख संजय गोडबोले, मकरंद घळसासी, प्रांत टोळी सदस्य निनाद गायकवाड, उदय तिळगुळकर उपस्थित होते. या विशेषांकात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, भैय्याजी जोशी, मिलींद परांडे, विनायक देशपांडे, चंपत राय, दादा वेदक, साध्वी ऋतंभरा आदी मान्यवरांचे लेख, तसेच स्मरणचित्रे आहेत.
What's Your Reaction?