अपेक्षेप्रमाणे राऊतांना २००पेक्षा अधिक मताधिक्क्य.१३अवैध मतांमुळे ५००चा पल्ला दूर
पालकमंत्री गोरे यांनी शब्द खरा ठरवला, राऊत आणि सोपल आमदार म्हणून साथ साथ राहणार, वसंत देशमुखांचे शतक पार, आता कसोटी धैर्यशील मोहिते पाटलांची
सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचे बाहुबली उमेदवार राजेंद्र राऊत यांनी, पालकमंत्र्यांनी दावा केल्याप्रमाणे २०० पेक्षा (३६५)अधिक मताधिक्य घेऊन बाजी मारली. मतमोजणीत १३ मते अवैध ठरल्यामुळे राउत यांना ५०० मतांचा पल्ला गाठता आला नाही. ही अवैध तेरा मते कोणाची हा कळीचा मुद्दा आहे.
सोमवारी २२ जून रोजी सकाळी दोन तासात निकाल जाहीर झाला, राजेंद्र राऊत यांना ४८३, शरद पवार गटाचे वसंत देशमुख यांना ११८ मते तर १३ मते अवैध ठरली. ३६५ मतांनी राऊत जिंकले. राऊतांमुळे बार्शीला आता दोन आमदार मिळाले आहेत. असा मान पहिल्यांदाचा मिळाला आहे. दिलीप सोपल (उबाठा) यांनी २०२४मध्ये बार्शीची जागा जिंकली आहे. त्यांनी राऊतांचा पराजय केला होता. आता राऊत आणि सोपल आमदार म्हणून साथ साथ राहणार आहेत
निवडणुकीच्या प्रारंभी राऊतांना मताध़िक्क्य ६०० पेक्षा अधिक, सोलापूर मनपात १०० पार तर श.प.गटाचे वसंत देशमुख यांची गिनती १६पेक्षा पुढे की कमी इतकीच उत्सुकता होती. निवडणूक प्रचारात खा.धैर्यशील मोहिते पाटलांनी शड्डू ठोकल्यामुळे शरद पवार गटाचे वसंत देशमुख यांना १६ पेक्षा अधिक मते मिळणार हे स्पष्ट झाले. खा.मोहिते पाटलांनीही १६च्या पुढे अंक मोजण्याचे आव्हान दिले होते. निवडणूक प्रचार संपल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्र परिषदेत २०० पेक्षा अधिक़ मतांनी राऊत विजयी होतील, असा दावा केला होता. प्रत्यक्षात २०० पेक्षा अधिक म्हणजे ३६५ मताधिक्य मिळाले. आज निवडणूक़ मतमोजणी काळात पालकमंत्री सोलापुरात तळ ठोकून होते. विजयाचा गुलाल त्यांनी उधळला.
प्रारंभी निवडणूक बिनविरोध अशी चर्चा जोरात सुरू होती. आधी काँग्रेस उमेदवाराच अर्ज बाद झाला. पण खा.मोहिते पाटलांनी वसंत देशमुखांचा अर्ज रिंगणात राहील, अशी खेळी केली. विधान परिषद निवडणुकीची सारी मदार पालकमंत्र्यांकडे होती. त्यांच्या टीममध्ये आ.सचिन कल्याणशेट्टी कायम सोबत होते. महायुतीमध्ये शिंदे सेना, अजीतदादांचा पक्ष यांनाही गोरे यांनी आपल्या बाजूने वळविले. शिवाय विरोधी श.प. व काँग्रेस, उबाठा व अन्य पक्षांचीही मते मिळवण्याची व्यूहरचना होती. मतमोजणीनंतर १३ मते अवैध ठरल्यामुळे ती नेमकी कोणाची, तसेच ती बाद कशामुळे झाली की हेतुत: मते बाद केली/झाली, याचा उलगडा नंतर होईल, असे मानले जाते.
What's Your Reaction?