रा.स्व.संघाचे समाज जीवनात योगदान; शताब्दी निमित्त मुंबईत विराट हिंदू संमेलन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत आयोजित विराट हिंदू संमेलनात विविध क्षेत्रांतील मान्यवर, स्वयंसेवक, युवक आणि मातृशक्ती सहभागी झाली. कार्यक्रमात राष्ट्रभक्ती, सामाजिक समरसता आणि संघटनशक्तीचा संदेश देत ‘पंच परिवर्तन’ अभियानाद्वारे समाजजीवनात सकारात्मक बदल घडविण्याचे आवाहन करण्यात आले.

Jun 23, 2026 - 01:33
 0  72
रा.स्व.संघाचे समाज जीवनात योगदान; शताब्दी निमित्त मुंबईत विराट हिंदू संमेलन

मुंबई, : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विराट हिंदू संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले. या संमेलनाला समाजातील विविध घटकांतील मान्यवर नागरिक, स्वयंसेवक, युवक तसेच मातृशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होती. संघाच्या शंभर वर्षांच्या राष्ट्रसेवेच्या प्रवासाचे स्मरण करणे आणि समाजाला संघटन व राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरित करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
    विराट हिंदू संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून नितीनजी निळकंठ जोग (पार्ले विभाग बौद्धिक प्रमुख), राधेश्यामजी पाणिग्रही (पार्ले विभाग कार्यवाह), रणजितजी मुनी (श्री रमेश मुनी सेवा संघाचे अध्यक्ष), परीजी रावत (विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी जिल्हा संयोजिका), रविनारायण पाणिग्रही (बजरंग दल विभाग विस्तारक व जिल्हा साप्ताहिक मिलन प्रमुख) तसेच सीमांचलजी पाणिग्रही (जिल्हा धर्माचार्य प्रमुख) उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून हिंदू समाज संघटन, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक उत्तरदायित्व यावर सविस्तर विचार मांडले.
    यावेळी उपस्थित वक्त्यांनी उद्बोधन केले.  त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या एका शतकात राष्ट्रभक्ती, सामाजिक समरसता,सांस्कृतिक जागरण आणि सेवा कार्याच्या माध्यमातून समाजजीवनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. संघाने लाखो स्वयंसेवक घडवून त्यांच्यामध्ये राष्ट्र आणि समाजासाठी समर्पणाची भावना निर्माण केली आहे. शिक्षण, ग्रामविकास, सेवा, आपत्ती निवारण तसेच सामाजिक संघटन या विविध क्षेत्रांत संघाचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे.
    शताब्दी वर्षाच्या निमित्ताने समाजजीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी संघातर्फे "पंच परिवर्तन" या विशेष अभियानाचे आवाहन करण्यात आले. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, स्वत्वाचा बोध, पर्यावरण संवर्धन आणि नागरिक कर्तव्य या विषयांवर व्यापक जनजागृती करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. प्रत्येक नागरिकाने या पाच विषयांचा आपल्या जीवनात अंगीकार करून राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन वक्त्यांनी केले.
     कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी संघटित, समरस, संस्कारित आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी सक्रिय भूमिका बजावण्याचा संकल्प केला. "भारत माता की जय", "वंदे मातरम्" आणि "जय श्रीराम" यांच्या घोषणांनी कार्यक्रमाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow