ज्येष्ठ स्वयंसेवक शांतीलाल जैन यांचे निधन

जिल्हा कार्यवाह म्हणून अतुलनीय कामगिरी, रामजन्मभूमी आंदोलन,डॉ.हेडगेवार जन्मशताब्दी काळात मोठे योगदान

Jun 24, 2026 - 21:06
 0  28
ज्येष्ठ स्वयंसेवक शांतीलाल जैन यांचे निधन

(विजयकुमार पिसे)

सोलापूर, दि.२४ जून : सोलापुरातील ज्येष्ठ संघ स्वयंसेवक तथा माजी जिल्हा कार्यवाह शांतीलाल रिखबचंद जैन (वय ७८) यांचे वार्धक्याने भाग्यनगर (हैदराबाद) येथे बुधवारी २४ जून रोजी पहाटे ४ वाजता निधन झाले. पंढरपूर आणि सोलापूर (संयुक्त) जिल्ह्याचे (१९८७/१९९३) जिल्हा कार्यवाह म्हणून त्यांनी दायित्व निभावले होते. तत्पूर्वी (१९८२/८७) सोलापूर शहर कार्यवाह होते. रामजन्मभूमी आंदोलन आणि डॉ.हेडगेवार जन्मशताब्दी काळात संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये संघ कार्य विस्तारात त्यांचे मोठे योगदान होते.  

मूळचे राजस्थानातील मारवाड प्रांत आहोरचे रहिवासी असलेले शांतीलाल जैन हुबळी येथून सोलापुरात व्यवसायानिमित्त आले. वह्यांचे मोठे उत्पादक म्हणून प्रसिध्द होते. १९८९ मध्ये संघ संस्थापक डॉ.हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी काळात संघ कार्याचा विस्तार अगदी ग्रामीण भागात वाड्या वस्त्या व गाव पातळीपर्यंत या काळात शांतीलाल जैन यांनी जिल्हा कार्यवाह म्हणून यशस्वीपणे केला. तसेच रामजन्मभूमी आंदोलनाची व्यापकता सर्वस्तरावर नेली. या दोन घटकांबरोबर संघ परिवारातील अन्यान्य संस्था,संघटनांचा पाया अधिक व्यापक प्रमाणात केला. 

   योजकस्य दुर्लभ: असे, कार्यकर्त्यांमधील सुप्त गुण हेरून त्यानुसार त्याकडे योग्य ते दायित्व देण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. त्यामुळे अनेक कुशल संघ स्वयंसेवक कार्यकर्ते या काळात तयार झाले. १९८९ शताब्दी काळातच सोलापुरात डॉ.हेडगेवार रक्तपेढी स्थापन झाली. या रक्तपेढीचे शांतीलाल जैन संस्थापक सदस्य होते.

   भारतीय जनता पार्टी तेव्हा नव्यानेच स्थापन झाली होती. तेव्हा देखील शांतीलाल जैन यांनी पुढाकार घेत अनेक संघ स्वयंसेवक भाजपाला दिले. लिंगराज वल्याळसह अनेक संघ स्वयंसेवक १९८५मध्ये पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आणले. वल्याळ पुढे महापालिकेत सभापती व १९९२ मध्ये भाजपाचे पहिले आमदार म्हणून निवडून आले. पुढे १९९५ मध्ये दुसर्‍यांदा पुन्हा आमदार व लोकसभेचे खासदार झाले. विहिंपचे जिल्हा अध्यक्ष सुरेशचंद्र देशमुख गुरुजी यांचे पुत्र सुभाष देशमुख यांना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत १९९७ मध्ये उभे केले. तेव्हा सोलापूर जिल्ह्यात भाजपाची पाटी कोरी होती. खा.लिंगराज वल्याळ यांच्या मदतीने सुभाष देशमुख यांना भाजपात आणून निवडणूक जिंकवून दिली. 

     स्व. शांतीलाल जैन यांच्या पार्थिवावर भाग्यनगर येथे बुधवारी सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, उद्योजक सुपुत्र महेंद्र, चार विवाहित कन्या, बंधू सूरजमल असा मोठा परिवार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow