तुम्ही चुकलात तर, माफी नाही! विजय विकासाचा : फडणवीस
आ.कोठे यांनी केले सारथ्य...विजयाचे शिल्पकार जनता, कार्यकर्ते आणि पालकमंत्री गोरे व सोबत आमदारांची फौज! मोलाचा सल्ला; एकवेळ विकास कमी झाला तरी चालेल, पण जनतेबरोबरचा व्यवहार महत्वाचा..!
(विजयकुमार पिसे)
सोलापूर : मनपा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला छप्पर फाड के विजय मिळाला. या ऐतिहासिक विजयाबद्दल यशस्वी लोकप्रतिनिधींच्या कौतुक सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुकाबरोबरच तुम्ही चुकलात तर माफी नाही, असे उद्गार काढले.
सोलापुरात मंगळवारी २८ रोजी फडणवीसांच्या उपस्थितीत कृतज्ञता आणि विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेे, मी हात जोडून नमन करेन की, सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीवर ऐतिहासिक विश्वास दाखवला आहे. आम्ही तुमच्या कर्जात असून हे कर्ज विकासाच्या माध्यमातून फेडण्याचा प्रामाणिकपणे जरूर प्रयत्न करू.
नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना मोलाचा सल्ला देखील त्यांनी दिला. हा विजय विकासाचा विजय असून ज्यांचा विकासावर विश्वास आहे अशांचा विजय आहे. माझ्यामुळे मी निवडून आलोय असा कृपया गैरसमज करून घेऊ नये, अन्यथा व्यवहार बदलत जातो. एकवेळ विकास कमी झाला तरी चालेल. तुमचा व्यवहार कसा आहे हे महत्त्वाचे आहे. लोक जसं तुमच्या विकासाकडे पाहतात तसेच तुमच्या व्यवहाराकडे सुद्धा त्यांचे लक्ष असते, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.
लोकप्रतिनिधींकडून कुठल्याही परिस्थितीत पारदर्शी आणि प्रामाणिकपणे काम झालं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही, हे देखील त्यांनी बजावले. पारदर्शी आणि प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लोकांनी निवडून दिले आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीत देवा भाऊ पाठीशी आहे पण चुकला तर, चुकीला माफी नाही!
आ.कोठे यांनी केले फडणवीसांचे सारथ्य...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ह.दे.प्रशालेवरील सभा आटोपून विमानतळाकडे निघाले, तेव्हा युवा आ.देवेंद्र कोठे यांनी त्यांचे सारथ्य केले. समाजमाध्यमावर हे छायाचित्र व्हायरल झाले असून अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. फडणवीस यांनी हात उंचावून दाद दिली आहे.
What's Your Reaction?