गुजरातमधील नव्या ७ मनपांवरही कमळ फुलले
एमआयएम व स.पा.ची एन्ट्री, आपचा संघर्ष, काँग्रेस घसरली
(विजयकुमार पिसे)
गुजरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत नव्याने स्थापन झालेल्या ७ महापालिकांमध्येही कमळ फुलले आहे. काँग्रेसला पिछाडीवर टाकलेल्या आम आदमी पार्टीचा संघर्ष जारी आहे. एमआयएम व समाजवादी पार्टीने राज्यात यानिमित्ताने एन्ट्री करून राजकीय धक्का दिला आहे.
गुजरातमध्ये २६ एप्रिल रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान झाले. आज २८ एप्रिल रोजी मतमोजणी सुरू असून प्राथमिक माहितीनुसार सर्वत्र भाजपा आघाडीवर आहे. राजकीय विश्लेषक या निवडणुकांना विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल मानत असून १५ मनपा, ८४ न.पा., ३४ जि.प. २६० पं.स.निवडणुकीत भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढती झाल्या. गुजरातमध्ये ७ मनपा नव्याने स्थापन झाल्या असून तिथे प्रथमच निवडणूक झाल्या आहेत. यामध्ये नडियाद, मेहसाणा, वापी, पोरबंदर, सुरेंद्रनगर, नवसारी आणि मोरबी या महानगरपालिकांत भाजपाने बाजी मारली आहे. तसेच १९ नगरपालिकांवरही भाजपने वर्चस्व सिद्ध केले आहे.
सुरतेत आम आदमी पार्टीची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. कारण गत निवडणुकीत त्यांनी २७ जागा जिंकल्या होत्या. यंदा 'आप'ला अद्याप खाते उघडता आलेले नाही. भाजपा ४३ जागांसह बहुमताकडे वाटचाल करत आहे. काँग्रेसला केवळ १ जागा मिळाली आहे.
क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीची हार
राजकोटमध्ये काँग्रेसकडून मैदानात उतरलेल्या क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या भगिनी नयनाबा जडेजा यांचा पराभव झाला आहे. भाजपा उमेदवाराने त्यांचा पराजय केला. तर आम आदमी पार्टी सोडून भाजपात आलेले माजी आमदार भूपत भयानी यांचा दारुण पराभव झाला आहे.
What's Your Reaction?