विद्यार्थी आंदोलनाचे तीन तंबू, तीन कंपू; अभिजीत दीपकेंचं लक्ष्य: दिल्लीचेही तख्त राखितो!
स्पर्धा परीक्षांच्या धोरणांवरील असंतोषाला राजकीय फोडणी; अभिजीत दीपकेंच्या भाषणातील ‘दिल्लीचेही तख्त राखितो’ वक्तव्याने नव्या चर्चेला तोंड
(विजयकुमार पिसे)
पुणे : जंतर मंतरमुळे अभिजीत दीपकेंचा केवळ आत्मविश्वासच वाढला नव्हे तर राजीनाम्यांचे सत्र चालू ठेवून दिल्लीचे तख्त बळकावयाचे असावे. पुण्यातील आंदोलनात दीपकेंची घोषणाच आहे, दिल्लीचेही तख्त राखितो। अशा आंदोलनाच्या निमित्ताने देशात अराजकता निर्माण करण्याचा डाव आहे. दुसरीकडे पुण्यातील आंदोलनाचे तीन तंबू,तीन कंपू हा निष्कर्षही समोर आला आहे.
स्पर्धा परीक्षांच्या धरसोड धोरणांमुळे विद्यार्थ्यांचा असंतोष उफाळून आला आहे. आंदोलन सुरू आहे. यावेळी दीपकेंनी केलेलं भाषण एका मराठी चॅनलने दाखवले. यामध्ये आंदोलनाची धार टप्प्याटप्प्याने चढवायची. आंदोलनात मुलींची संख्या वाढली पाहिजे, तुम्ही लग्न करून तिकडे सासरी जाणार का? असा प्रश्नही दीपकेनी उपस्थित केला. आता मी तिकडे दिल्लीत जाणार आहे. तिथे ज्ञानूचा (निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेशकुमार) राजीनामा आणि इथे महाराष्ट्रात भीमनवारांचा (एमपीएससीचे अध्यक्ष) राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. महाराष्ट्र हा दिल्लीचेही तख्त राखितो..। हे लक्षात आहे ना!
एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन आता राजकीय आखाड्याच्या दिशेने जात आहे. यामध्ये तरुणांचा आक्रोश असला तरी पडद्यामागे आंदोलनाचे तीन तंबू, तीन कंपू दिसत आहेत. विद्यार्थी हिताचा बुरखा पांघरून राजकीय पक्ष राजकीय डाव साधत आहेत. त्यामुळे तीन तंबू म्हणजे तीन फुटी दिसत आहेत. एक गटाचा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीचा आग्रह, 2025 पासूनची वर्णनात्मक पद्धतच कायम राहावी, यासाठी दुसरा, आणि आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी तिसरा गट सक्रिय झाला आहे. यातून तीन कंपू तिथे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे गटतटामुळे आंदोलन विस्कटलेले आहे. आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बहुतेक राजकीय पक्ष आपला डाव साधत आहेत. तर राजीनामा सत्रातून मोदींचे सरकार उलथवायचे हे दीपकेंचे लक्ष्य आहे. म्हणून जाहीर भाषणात दिल्लीचेही तख्त राखितो, ही भाषा आहे.
आंदोलनापूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबईत स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांची बैठक घेऊन समाधान केले. काही झटपट निर्णय देखील घेतले. दरम्यान या आंदोलनाचे राजकीय हत्यार म्हणून वापरण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आ. रोहित पवारांनी राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू ठेवण्यास भाग पाडले.
दिल्लीत राहुल गांधीनी सत्याग्रहाचे नाव देउन एनएसयूआयची फौज मैदानात उतरविली. त्यामुळे चढाओढीने राजकीय नेते आंदोलनास हजेरी लावत आहेत. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढली तरी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमही निर्माण झाला आहे. यात भर म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे काल आंदोलनात सहभागी झाले. अर्थात..असे तीन तंबू झाले तर, विद्यार्थी संभ्रमित होत आहेत.
What's Your Reaction?