देवाभाऊ करणार भाईंचा करेक्ट कार्यक्रम!
महाराष्ट्रात चालंलय काय? मोटा भाईवरून कुरघोडी,महायुतीत घरफोडीमुळे तणाव,मंत्रिमंडळ बैठकीवर शिंदे सेनेचा बहिष्कार,भाजपाचे मिशन 2029
(विजयकुमार पिसे)
महायुतीमध्ये मोटा भाई कोण यावरून सुरू असलेली कुरघोडी, घरफोडीपर्यंंत गेली आहे.त्यामुळे महाराष्ट्रात चाललंय काय? अशी कुजबूज सुरू असून देवाभाऊ, भाईंंचा करेक्ट कार्यक्रम करणारच, यासाठी दिल्लीच्या मोटाभाईंनी देखील सिग्नल दिला अशी चर्चा आहे. भाजपा सेना युतीत तणाव असे चित्र एकीकडे, तर भूखंडावरून अजीतदादा बॅकफूटवर गेले आहेत. महायुतीत सहकारी पक्षांची कोंडी ठरवून केली जाते आणि भाजपाशिवाय दुसरीच व्यक्ती *दम(निया) भरतो, ही वस्तुस्थिती पाहता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सेनेच्या काही मंत्र्यांनी दांडी मारली, त्यावर एकनाथ शिंदे आणि अजीत पवारांनी सारवासारव केली. पण त्यांच्या चेहर्यांवरचे भाव, महायुतीत काही तरी शिजतंय असेच होते. शिवशाही (1995)सरकारच्या काळात एकमेकांच्या नेत्यांना पक्षात प्रवेश द्यायचा नाही,असा अलिखित नियम होता. आता महायुतीत (2025)असा नियम नसला तरी तू बडा की मै यासाठी फडणवीस,शिंदे आणि पवार एकमेकांच्या पक्षातील नेते फोडत आहेत. ही स्थिती आता हाताबाहेर गेली आहे. मोहोळ तालुक्यातील अनगर येथे राजन पाटील, माजी आ.यशवंत माने यांना भाजपात घेतले. तिथे 17 उमेदवार बिनविरोध आणून अजीतदादांवर कुरघोडी केली. घड्याळ चिन्हाच्या उमेदवाराचा अर्ज देखील बाद केला. त्यावर मात करताना कागल न.प.मध्ये मुश्रिफ आणि घाटगे हे हाडवैरी नेते (घड्याळ आणि तुतारी) एक झाले आहेत. त्यामुळेही देवाभाऊ संतापले आहेत.
दरम्यान भाजप सेना बैठकीत पक्षफोडीवरून खडाखडी झाली. तेव्हा देवाभाऊनी सुरुवात कोणी केली असा रोकडा सवाल केला. गळाभेट घेत पाठीत खंजीर खुपसणार्या मित्रापेक्षा, समोरासमोर थेट भिडणारा शत्रू कधीही परवडला, मुँह मे राम, बगल मे छुरी असा मित्र घातक असतो. शिंदे सेनेचा हा उपक्रम देवाभाऊनी सर्वांना सुनावला. तेव्हा तेथील चेहरे पाहण्यालायक होते. मी मुख्यमंत्री होणार,असंही शिंदे सांगतात. मोटा भाईंचा आशीर्वाद असल्याची हवा देखील करतात.पण कुरघोड्या संपल्या नाहीत. जरांगेंचं आंदोलन असो, राणे परिवारात दोन भावांचा नको असलेला संघर्ष, सांगोल्यात शहाजीबापूंची भाजपाविषयी कमरेखालची भाषा, पुण्यात मोहोळ/धंगेकर, नाशकात दादा भुसे/गिरीश महाजन, ठाण्यात गणेश नाईक/श्रीकांत शिंदे असा संघर्ष पेटवून महायुतीलाच चूड लावण्याचा प्रक़ार कसा काय? मुंबई मनपात फिफ्टी,फिफ्टीचा दावा, इतकेच नव्हे तर महापौर आमचा या शिंदेसेनेच्या अटी कशा काय? महाराष्ट्रात आणि दिल्लीतही भाजपा मोटा भाई ही वस्तुस्थिती. पण एकनाथ भाईंचा शिवसेनेलाच सगळं पाहिजे, अन्यथा भाजपाला दगा देण्याची खेळी पाहता देवाभाऊनी भाईंच्या पक्षाची कुंडलीच बाहेर काढली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिंदे सेनेचा सुफडा साफ करण्याचा मोटा भाईंचा आदेशच आहे, म्हणे. म्हणून त्यांनी मुंबईत भाजपा कार्यालय भूमीपूजनप्रसंगी भाजपला कुबड्यांची गरज नाही. अर्थात 2029 मध्ये भाजपा स्वबळावर सत्तेत. शिंदे सेना असो वा अजीत दादा. या दोन्ही पक्षांना या निवडणुकीत नामोहरम करण्याचे भाजपाचे धोरण आहे. नाकात पाणी जात असेल तर पायाखाली घ्या. म्हणजे आताच्या निवडणुका म्हणजे शत प्रतिशत भाजपाच. मिशन 2029ची ही तयारीच. जय भाजपा,तय भाजपा!
What's Your Reaction?