अखेर युती तुटली; फडणवीसांची नाराजी, प्रदेशाध्यक्षांकडून कारवाई,डॅमेज कंट्रोल!
भाजपा,काँग्रेस आणि एमआयएम युतीची सर्वत्र निंदा, टीका टिपणी;शिंदे सेना ठरली वरचढ, भाजपा नेत्यांच्या चुकीचा फटका
(विजयकुमार पिसे)
विधानसभा निवडणूक बटेंगे तो कटेंगे घोषणा करून जिंकली. पण याच घोषणेचा विपर्यास करत भाजपाने एमआयएम आणि काँग्रेस बरोबर युती करून भाजपा हितचिंतक मतदारांना दुखावले. देशभरातही पडसाद उमटले. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर प्रदेश भाजपा कार्यालय खडबडून जागे झाले आणि दोन्ही ठिकाणी भाजपा युती करणार नाही, असे जाहीरपणे खुलासा करणे भाग पडले. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपाने केलेली अशी युती कुणालाही मान्य नव्हती, अन्यथा मनपा निवडणुकांवर परिणाम होईल, या भीतीने प्रदेश भाजपाला आ.भारसाकळे यांना नोटीस धाडणे क्रमप्राप्त झाले. परंतु हात दाखवून अवलक्षण का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत भाजप- एमआयएम यांच्या युतीने हिंदुत्व कुठे गेले, असा सवाल उपस्थित केला गेला. सत्तेसाठी काय पण हा नवा पॅटर्न पक्षात नव्याने आलेल्या आणि त्यांच्याच हातात कारभार गेल्यामुळे अशा इनकमिंगचे बळ वाढले आहे. त्यामुळे भाजपाने आ.प्रकाश भारसाखळे यांना पत्र लिहून खुलासा करण्याच्या सूचना केली, असे वृत्त आहे.
दुसरीकडे अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेस युती झाली आहे. शिंदसेनेला सत्तावंचित करण्यासाठी भाजप आणि काँग्रेस हातमिळवणी झाली. देशभर मोदी काँग्रेसमुक्तचा नारा देतात, तर इथे झालेल्या विचित्र युतीची चर्चा देशभरात झाली. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना कठोर व्हावे लागले. इथेही 24 तासात चक्रे फिरली. आणि अभद्र युती तुटली, असे भाजपालाच जाहीर करावे लागले. न.प. आणि मनपा निवडणुकांच्या दरम्यान चुकीचे निर्णय घेतले गेले. नंतर चक्रे फिरली, यामुळे संबंधित लोकप्रतिनिधी,आमदारांना निर्णयापासून माघार घ्यावी लागत असल्याचे चित्र समोर आहे. वास्तविक यासाठी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हेच अधिक जबाबदार आहेत, *डॅमेज कंट्रोल ऐवजी *कंट्रोल डॅमेज अध्यक्ष असा अनुभव पक्षाला येत आहे.
What's Your Reaction?