सोलापूरकरांना दररोज पाणी : फडणवीस
हजारोंच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांचा संकल्प, सभा
प्रतिनिधी/सोलापूर
शहराची लोकसंख्या 2057 जितकी असेल त्या लोकसंख्येला पुरेल इतके पाणी दररोज देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे भाजपचा महापौर झाल्यानंतर सोलापूरकरांना दररोज पिण्याचे पाणी हा शब्द मी देत आहे, असे जाहीर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांसाठी संकल्प सोडला.
हजारो सोलापूरकरांच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांची शनिवारी विजय संकल्प सभा झाली. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, आ.समाधान अवताडे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, शशिकांत चव्हाण, चेतनसिंह केदार, शहाजी पवार आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सोलापूर शहराला दररोज पाणी मिळण्यासाठी 892 कोटी रुपये निधीची योजना लवकरात लवकर पूर्ण करणे, सोलापूर शहरातील चाळींच्या पुनर्विकासाला चालना देणे, संपूर्ण शहरासाठी पिण्याचे पाणी, मलनिस्सारण प्रकल्प करणे,आवास योजनापूर्ती, अक्कलकोट रस्ता आणि होटगी रस्ता एमआयडीसीतील सुविधांची पूर्तता यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. जिथे विमानसेवा सुरू होते तिथे उद्योग व्यापार आणि पर्यायाने रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो. सोलापूर या औद्योगिक नगरीला भरभराट आणण्यासाठी विमानसेवा भाजपा सरकारने सुरू केली आहे. आगामी काळात सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंगचीही सुविधा देण्यात येणार आहे, असेही सांगितले. सोलापूरची विमानसेवा सुरू होणार नाही असे काही जण म्हणत असत. परंतु भाजपाने विमानसेवा सुरू करून दाखवली याकडे लक्ष वेधले.
सोलापूरच्या यंत्रमाग उद्योगासाठी इचलकरंजी पॅटर्न राबविण्यात येणार आहे. सोलापूरकरांनी 15 जानेवारीला कमळाची काळजी घ्यावी. 16 जानेवारीपासून तुमची काळजी देवाभाऊ घेईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
महापौर भाजपचाच होणार : पालकमंत्री गोरे
सोलापूरने जे मागितले ते सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आहे. सोलापूरचा चौफेर विकास होत आहे. सोलापूरचे भविष्य ठरविणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे सोलापुरातील सर्व लाडक्या बहिणींसह सर्व सोलापूरकरांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन करून महापौर भाजपाचाच होणार, असेही स्पष्ट केले.
रोज पाणी दिल्याशिवाय मत मागायला येणार नाही : आ.कोठे
दररोज पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे संपूर्ण पाठबळ सोलापूरला आहे. त्यामुळे ही योजना लवकरच पूर्णत्वास येणार आहे. सोलापूरला दररोज पाणी दिल्याशिवाय पुन्हा मते मागायला येणार नाही, असे आ. देवेंद्र कोठे यांनी ठामपणे म्हणाले.
What's Your Reaction?