महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला ठोकल्या बेड्या

अवैध पिस्तूल तस्करी, मोहोळच्या सिकंदरचे राजस्थानच्या गँगवॉरशी संबंध,पंजाब पोलिसांची कारवाई

Nov 1, 2025 - 00:38
 0  1489
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला ठोकल्या बेड्या

  (विजयकुमार पिसे) 

 महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख (मोहोळ) हा राजस्थानातील एका गँगवॉरसोबत सापडला असून पिस्तुलांची अवैध तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सिकंदर शेख मोहोळचा असून यानिमित्ताने कुस्तीपटूंचे अवैध कारनामे समोर आले. महाराष्ट्र केसरी जिंकणारा कुस्तीपटू आंतरराज्य गँगवॉरशी संबंधित असल्याची घटना धक्कादायक आहे.

   अवैध पिस्तूल तस्करी प्रकरणात सिकंदरचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. हरियाणा आणि राजस्थानमधील विक्रम उर्फ पपला गुर्जर या कुख्यात टोळीशी त्याचा संबंध आहे. उत्तर प्रदेशातून पिस्तुलांची तस्करी करत असल्याचे आज उघडकीस आले. पंजाब पोलिसांनी या गँगवर पाळत ठेवून पर्दाफाश केला व अटकेची कारवाई केली, या कारवाईत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि त्याचे अन्य चार साथीदारही हाती लागले. या सर्वांना बेड्या ठोकल्यामुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सध्या हे सर्व आरोपी पोलिस कोठडीत असून, पुढील चौकशीत या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती मिळेल, असा दावा पंजाब पोलिसांनी केला आहे.

   कुस्तीपटू सिकंदरने आपल्या प्रतिमेचा उपयोग शस्त्र विक्रीसाठी केला होता. मोहाली पोलिसांच्या सीआयए पथकाने आंतरराज्यीय शस्त्र पुरवठा करणार्‍या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील चार सदस्यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यात राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सिकंदर शेख याचा समावेश आहे. ही टोळी शस्त्र तस्करी, खून आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे समजते. अटकेतील आरोपींकडून 5 अवैध बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. यात 4.32 बोरच्या पिस्तुल आणि 1.45 बोरची पिस्तुल, तसेच जिवंत काडतुसे, रोख रक्कम आणि 2 लक्झरी कार हा मुद्देमाल आढळून आला आहे. 

     मोहालीचे एसएसपी हरमनदीप सिंग यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले दानवीर आणि बंटी हे मोहालीत सिकंदर शेख नावाच्या व्यक्तीला शस्त्रे पुरवण्यासाठी येत असल्याची खबर आम्हाला मिळाली होती. त्या आधारे सीआयए पथकाने सापळा रचला. दानवीर, बंटी आणि सिकंदर शेख या तिघांना शस्त्रांसह अटक केली. अधिक चौकशीतून समोर आले की, ही शस्त्रे मोहाली जवळील एका गावातील रहिवासी कृष्णकुमार उर्फ हॅपी गुर्जर याला पुरवठा केली जाणार होती. दरम्यान पोलिसांनी हॅपी गुर्जर यालाही अटक केली आहे. 

    पुण्यातील महाराष्ट्र केसरी (2023) लढतीत पंचाच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता. त्याच्यावर अन्याय झाल्याच्या भावनेने सिकंदर शेखला महाराष्ट्राने अक्षरश: डोक्यावर घेतले होते. पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे सोशल मीडियात ट्रोलिंग झालं होतं. कुस्तीवरुन राज्यातील वातावरण तापलं होतं. दरम्यान 2024 मध्ये कुस्ती जिंकून शेख महाराष्ट्र केसरीचा सिकंदर झाला. मी जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी असल्याचा त्याचा दावा. आज मात्र हा सिकंदर अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटकेमुळे त्याचा काळा चेहरा समोर आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow