लातूर पॅटर्नचा 'नीट' पर्दाफाश! आरसीसीच्या शिवराज मोटेगावकरला बेड्या

बदनाम महाराष्ट्र, पुत्रप्रेमापोटी पेपर फोडला, पुरावेही नष्ट केले, मोटेगावकरचे राज्यात 40 हजार विद्यार्थ्यांचे नेटवर्क,1500 कोटींची उलाढाल, अनधिकृत क्लासेसवर बुलडोझर कधी?

May 19, 2026 - 00:54
 0  114
लातूर पॅटर्नचा 'नीट' पर्दाफाश! आरसीसीच्या शिवराज मोटेगावकरला बेड्या

(विजयकुमार पिसे)

ड्रग्ज माफीया, महिलांवरील वाढते अत्याचार अशा अनेक निंद्य घटनांमुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे. यामध्ये नीट पेपर घोटाळ्यांची भर पडली आहे. नीटचे सगळेच सूत्रधार दुर्दैवाने महाराष्ट्रातीलच निघाले आहेत. आज लातूर पॅटर्नचाही पर्दाफाश झाला. राज्यभरात तब्बल 40हजार विद्यार्थ्यांचे नेटवर्क आणि 1500 कोटींची उलाढाल असलेला बेताज बादशहा शिवराज मोटेगावकरला बेड्या ठोकल्यानंतर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार्‍या शिक्षण सम्राट,शिक्षण तज्ञांचे करायचे काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.

   3 मे रोजी होणार्‍या नीट परीक्षेचे पेपर 23 एप्रिल रोजीच फुटले, राज्यभरात डंका असलेल्या आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर हाच सूत्रधार निघाला. त्याच्या मुलासाठी (आर्यन मोटेगावकर) पेपर मिळवले, ते इतरांनाही पुरवले. त्यामधूनही कमाई केली. नंतर जणू काही झालेच नाही, अशा अविर्भावात सीबीआय अधिकार्‍यांना गोलमाल उत्तरे दिली. पण मोबाईलमधून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार तपास अधिकार्‍यांच्या हाती लागला आणि मोटेगावकरचा पर्दाफाश झाला. सोमवारी मोटेगावकरला सीबीआयने बेड्या ठोकल्या असून आजपर्यंत ताब्यात घेतलेले आरोपी आणि आता मोटेगावकर कनेक्शन जोडल्यामुळे पेपर फुटीची लिंक कुठंपर्यंत गेली याचा शोध घेणे क्रमप्राप्त आहे.

  दरम्यान सीबीआयने मोटेगावकरवर धाड घातल्यानंतर विद्यार्थी आणि राजकीय संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. लातूर आणि छ.संभाजीनगरात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी मोटेगावकर क्लासेसला काळे फासले. तर पुण्यात मॉडर्न कॉलेजच्या शिक्षिका मनीषा मांढरे निलंबित करण्यात आले.

  *पुणे विद्येचे माहेरघर, शिक्षणात *लातूर पॅटर्न, आणि *तीर्थक्षेत्र नाशिक या त्रिवेणी संगमात पेपर फुटीच्या भ्रष्टतेने काळे फासले गेले आहे. त्यामुळे हे कनेक्शन आणखी कुठंवर आहे, याचा शोध घेण्यासाठी अन्य शहरांमधील कोचिंग नेटवर्क, दलाल आणि आर्थिक व्यवहारांचा तपास सीबीआयने जारी ठेवला आहे. या संपूर्ण रॅकेटचे जाळे किती मोठे आहे आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध लागेल. पण लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणार्‍या शिक्षण सम्राट, तज्ञ यांच्यावरही बुलडोझर फिरणार का? असा सवाल उपस्थित होत असून देशभरात महाराष्ट्र बदनाम होत आहे. तसेच शिक्षण क्षेत्रामध्येही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow