दिव्यांग मुलासह आईने टाकली विहिरीत उडी
मुलाचे हाल बघवले नाहीत, म्हणून आत्महत्येचा टोकाचा निर्णय
सोलापूर : जन्मानेच दिव्यांग मुलाचे हाल बघवत नसल्याने मानसिक तणावाखाली असलेल्या आईने विहिरीत उडी टाकून दुर्दैवी मुलासह स्वत:चे जीवन संपवले. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हुलजंती येथे घडली.
या घटनेतील मयतांचे नाव अंबिका इराप्पा माळी (वय 33) आणि दिव्यांग मुलगा विशाल इराप्पा माळी (वय 9) असे आहे. या विषयी फिर्याद मयत महिलेचा दीर जकराया माळी यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली आहे. जकराया यांनी फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, अंबिका आणि इराप्पा यांचा मुलगा विशाल हा जन्मत:च दिव्यांग असून त्याला चालता फिरता, जेवता देखील येत नाही. त्याचे पालनपोषण आई अंबिकाच करते. मुलाचे हाल तिला बघवत नव्हते. त्यामुळे तिने टोकाचा निर्णय घेतला. बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास पेरणी करत असताना दीर जकरायाला गावातील उमाशंकर कनशेट्टी यांचा फोन आला. तुमची वहिनी अंबिका शेतातील विहीरीत मुलगा विशालसह पडून मयत झाली आहे. तेव्हा तात्काळ तिथे गेले असता भावजय अंबिका ही विहिरीत पाण्यामध्ये तरंगत मयत स्थितीत होती. मयत पुतण्या विशाल इराप्पा माळी यास विहिरीतून बाहेर काढले होते. त्यानंतर गावातील काही लोकांनी अंबिका हिचेही प्रेत विहिरीतून बाहेर काढले.
मुलगा विशाल हा दिव्यांग असल्याने त्याचे हाल बघवत नव्हते. शिवाय उभय जोडप्यांना दोन मुलीच आहेत. त्यामुळे ती तणावाखाली होती. म्हणूनच तिने मुलगा विशालसह विहीरीत उडी घेउन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाची पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे.
What's Your Reaction?