हद्दवाड परिसरातील सांडपाण्याच्या समस्येबाबत शिवसेना महिला आघाडी आक्रमक; महानगरपालिकेला निवेदन
हद्दवाड परिसरातील सांडपाण्याच्या समस्येबाबत शिवसेना महिला आघाडी आक्रमक; महानगरपालिकेला निवेदन
सोलापूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या शहर प्रमुख मीनलताई दास यांनी हद्दवाड परिसरातील प्रभाग क्रमांक २० मधील दीक्षित नगर व धनलक्ष्मी नगर येथे नागरिकांना भेडसावत असलेल्या सांडपाण्याच्या समस्येबाबत सोलापूर महानगरपालिका उपायुक्त तैबूर मुलाणी यांना निवेदन दिले.
या भागातील सुमारे ५० रहिवाशांकडून मीनलताईंकडे चेंबर संदर्भातील तक्रारी आल्या होत्या. अनेक घरांना प्रॉपर्टी चेंबर्स बांधून दिलेले नसल्याने सांडपाण्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असून नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या उघड्या गटारीतून दुर्गंधी पसरत असून परिसरात आरोग्यविषयक तक्रारी वाढत आहेत.
तसेच ज्या ठिकाणी चेंबर्स आहेत, तेथील झाकणे फुटलेली असून काही चेंबर्स तुडुंब भरलेले आहेत. या संदर्भात मीनलताईंनी यापूर्वीही संबंधित विभागाशी वारंवार संपर्क साधला होता, मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही.
धनलक्ष्मी नगर येथून ताई चौक ते देसाई नगर या मार्गावर असलेले गोल चेंबर पूर्णपणे ब्लॉक झाले असून, संबंधित गुत्तेदाराने रस्ता प्लॉट पाडून विकल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे मागील सर्व चेंबर्समधील पाणी रिव्हर्स फिरून रस्त्यावर वाहत आहे. या गुत्तेदारावर कठोर कारवाई करून रस्ता मोकळा करावा, नवीन चेंबर्स बांधून द्यावेत तसेच जुन्या चेंबरची वेळोवेळी साफसफाई व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
जर ही समस्या तातडीने सोडवली गेली नाही, तर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा मीनलताई दास यांनी दिला.
या प्रसंगी महिला आघाडीच्या पूजा कलागाते, ज्योती कुर्ले, लक्ष्मी कोटगी, महानंदा गोदे, सिद्धावा हत्तेनूर, पूजा व्हसगेरी, शांताबाई दुधनीकर, अंबुबाई लोहार, गंगुबाई जोगूर तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
What's Your Reaction?