आरटीआय तडीपार कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

सोबतच्या तरुणीवरही हल्ला, एक संशयितास अटक

Sep 19, 2025 - 00:28
 0  1285
आरटीआय तडीपार कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

सोलापूर : आरटीआय तडीपार कार्यकर्त्याची काल मध्यरात्रीच्या सुमारास लातूर येथे निर्घृण हत्या करण्यात आली. सोबतच्या तरुणीवरही हल्लेखोरांनी वार करून गंभीर जखमी केले आहे. या प्रक़रणात एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गाडीला कट लागला, त्यामुळे किरकोळ वादातून हत्या झाली ही प्राथमिक माहिती आहे. मयत आरटीआय कार्यकर्ता तडीपार होता. शिवाय सोबतच्या तरुणीमुळे हत्येमागचे अन्य कोणते कारण असावे, याविषयी पुढील पोलीस तपासात निष्पन्न होईल, असे सांगण्यात आले.

     दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुपचा रहिवासी असलेला आरटीआय कार्यकर्ता अनमोल अनिल केवटे (वय37) असे मयत तरुणाचे नाव आहे. गंभीर जखमी झालेली तरुणी अंत्रोळी गावची रहिवासी असून सोनाली सुखदेव भोसले (वय 27) हे तिचे नाव आहे. 

   संघटनेच्या एका कार्यक्रमानिमित्त बुधवारी दुपारी लातूर येथे दोघे एर्टीका कारने आले होते. पीव्हीआर चौकातील मंगल कार्यालयात मेळावा व नंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम झाला. रात्री जेवण करून 12 च्या सुमारास सोलापूरला जाण्यासाठी दोघे निघाले. तेव्हा एर्टीका कारला क्रूझरने (क्र.एमएच 26 व्ही 2356) कट मारली. कट का मारली याचा जाब विचारण्यासाठी खाली उतरलेल्या या तरुणासह सोबतच्या तरुणीवर क्रुझरमधील चौघांनी हल्ला केला. अनमोलच्या मानेवर आणि गळ्यावर वार करण्यात आले. सोबतच्या तरुणीस छातीत तीन आणि पाठीत दोन ठिकाणी चाकूने भोसकले. या संदर्भात एमआयडीसी पोलिसांत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लातूर येथे सदरचा मेळावा आरटीआय कार्यकर्ते प्रदीप पाटील (लातूर) खंडापूरकर यांनी आयोजित केला होता. सदर घटनेनंतर पाटील तिथे आले होते. त्यांनीच दोघांना रूग्णालयात दाखल केले, या दरम्यान अनमोल केवटे उपचारापूर्वीच मयत झाला. 

    दरम्यान हल्लेखोरांची क्रूझर गाडी रेणापूर तालुक्यातील घनसरगाव येथे आढळली. पोलिसांनी ती जप्त केली असून त्यावरील हातांचे ठसे मिळवून तपास केला असता संशयित शुभम पतंगे याला अटक केली आहे. या घटनेनंतर लातूर येथील हल्ल्यातील मयत अनमोल केवटे याच्यावर गुरुवारी दुपारी मंद्रुप येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow