सिंघमची २१ वर्षांत २४ वेळा बदली!
डॅशिंग आयएएस तुकाराम मुंडे यांच्या बदलीचा धडाका, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वन खात्यांची नवी जबाबदारी; अश्विनी भिडे मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त
(विजयकुमार पिसे)
धडाकेबाज निर्णयांमुळे कायम चर्चेत राहणारे डॅशिंग आयएएस सिंघम तुकाराम मुंढे यांच्या २१ व्या वर्षांच्या कारकिर्दीत २४ वेळा बदली करण्यात आली आहे. नियमानुसार एखाद्या पदावर तीन वर्षे काम करणे अपेक्षित असताना, मुंढे यांची सरासरी वर्षभरातच बदली होण्याचे सत्र, सरकार कोणतेही असो ते कायम राहिले आहे. मुुंढे यांच्याशिवाय अन्य प्रशासकीय बदल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत.
गेल्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल २४ वेळा बदली होण्याचा एक आगळावेगळा पण प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा विक्रम मुंढे यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. अत्यंत डॅशिंग, शिस्तप्रिय आणि नियमांवर बोट ठेवून काम करणारे अधिकारी मुंढे ओळखले जातात. सोलापूर आणि पुणे येथे त्यांनी काम केले. गड्डा यात्रा आणि चिमणी याविषयी त्यांची कामगिरी लक्षणीय ठरली. पुण्यात पीएमपीलमध्ये असाच करेक्ट कार्यक्रम केला. त्यामुळे तिथूनही मुंढे यांना लवकरच हटवण्यात आले. त्यामुळे त्यांच्याबाबत म्हटले जाते, सिर्फ नाम ही काफी है..!
आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. तिथे त्यांनी या मंत्रालयातील अनेक गैरप्रकार बाहेर काढले होते, दिव्यांगांना खर्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न केला. आता नव्या बदलीच्या ठिकाणी तीन महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपविली असून या नव्या विभागामध्ये कसा धडाका लावतात, याची उत्सुकता राहणार आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल आणि वन विभाग ही तीन खाती सोपवण्यात आली असून या विभागाचे सचिव म्हणून ते काम पाहणार आहे. जिथे गेलेे तिथे बेशिस्त खपवून घेतले नाही, शिस्त लावण्याचेच काम केले, त्यामुळे अनेक मनमौजी दुखावले गेले,त्यामुळे प्रसंगी ठराव करून तिथून मुंढे यांची बदली करणे क्रमप्राप्त झालं होतं.
मेट्रो वूमन अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांची वर्णी लागली असून विद्यमान आयुक्त भूषण गगराणी निवृत्त होत आहेत. भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची जबाबदारी देखील कायम राहणार आहे. मेट्रो रेलचं प्रमुखपद त्यांच्याकडे असेल.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र मुख्यमंत्री कार्यालयात गेले असून ते मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहतील. तर अतिरिक्त मुख्य सचिव विकास रस्तोगी यांच्याकडे वित्तीय बदलांची जबाबदारी राहील. अर्थ मंत्रालयात त्यांची वर्णी लागली आहे. याआधी ते कृषी मंत्रालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते.
परिमल सिंह कृषी खात्याचे सचिव झाले आहेत. त्यांच्याकडे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व्यवस्थापक अशी जबाबदारी होती. विनिता वैद सिंघल जल आणि मृदा संवर्धन विभागाचे सचिव नियुक्त झाले आहेत. त्या आपत्ती व्यवस्थापन, महसूल आणि वन विभागांचा कारभार पाहत होत्या. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी.पी.पृथ्वीराज वसई विरार महापालिकेचे आयुक्त झाले आहेत. आणि शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची जबाबदारी लहू माळी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याठिकाणी कुणाल कुमार होते. त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे. प्रेरणा देशभ्रतार यांची मत्स्य विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
What's Your Reaction?