कागदपत्रांच्या अडचणी सोडवण्यावर भर; पारधी समाजासाठी आर्थिक महामंडळाची घोषणा

मुंबईत अनुसूचित जमाती मोर्चाची बैठक; आदिवासी विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय, माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांची उपस्थिती

Apr 1, 2026 - 11:42
Apr 1, 2026 - 11:43
 0  18
कागदपत्रांच्या अडचणी सोडवण्यावर भर; पारधी समाजासाठी आर्थिक महामंडळाची घोषणा

मुंबई : नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात ३० मार्च २०२६ रोजी अनुसूचित जमाती मोर्चाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीच्या प्रारंभी नागपूर येथील आदिवासी समाजातील राज्यसभा खासदार म्हणून नियुक्त झालेल्या सौ. मायाताई इनवते तसेच अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आमदार देवराज होली यांचा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यानंतर झालेल्या चर्चेत महाराष्ट्रातील आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी योजनांची अंमलबजावणी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.

बैठकीदरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांनी आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले, रेशन कार्ड, रहिवासी दाखले मिळण्यात येणाऱ्या अडचणींचा मुद्दा उपस्थित केला. यावर प्रत्येक तालुका व जिल्हानिहाय या समस्यांचा आढावा घेऊन कागदपत्रांची पूर्तता केली जाईल, असे आश्वासन मंत्री उईके यांनी दिले.

दरम्यान, आदिवासी पारधी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक बळ मिळून समाज मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल, असा विश्वास प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

नव्याने नियुक्त झालेल्या राज्यसभा खासदार मायाताई इनवते यांनी आपल्या मनोगतात पक्षाने दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आदिवासी मंत्री अशोक उईके,खासदार मायाताई इनवते,आमदार हरिश्चंद्र भोई,अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष देवराज होली, प्रदेश संयोजक किशोरजी काळकर, एस.टी. मोर्चा महामंत्री सुदर्शन शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.  बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे आदिवासी समाजाच्या प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
    यावेळी  एस.टी. मोर्चा उपाध्यक्ष कोमल चव्हाण, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भिमराव चव्हाण, पुण्याच्या नगरसेविका राजश्री काळे, एसटी मोर्चा सचिव नकुल चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भोसले, ऍडव्होकेट  सुरेश काळे, उद्धव भोसले, साहित्यिक-समाजसेवक देविदास काळे, शिवा काळे-मुंबई, रमेश पवार, सचिन काळे, शितल काळे, बाईती बाई काळे.आदीसह महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात आदिवासी पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow