२६ विद्यार्थ्यांचे टीईटी पेपर सापडले,५जण उत्तीर्ण, सोलापूर पेपर फोडीच्या नकाशावर
ध्रुव अकॅडमीचा प्रकाश पवार आधी जि.प. शा़ळा मास्तर पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाकडे वळला आणि आता पेपरफोड्या निघाला!
सोलापूर : टीईटीच्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फुटीच्या निमित्ताने सोलापूरचे नाव नकाशावर आले असून भिवंडी पोलिसांनी सोलापूरच्या ध्रुव अकॅडमीच्या प्रकाश पवारला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याकडे२६ विद्यार्थ्यांचे पेपर सापडले आहेत. यापैकी ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या प्रकरणात आतापर्यंत २६जणांना अटक केली आहे. त्यापैकी काहींच्या जबाबातून सोलापूरमधील ध्रुव अकॅडमीचा पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचा चालक प्रकाश पवार (रा. सोरेगाव) याचाही पेपर लिक रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. प्रकाश पवारला अटक करण्यात आली असून त्यास १५ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पेपर लिकच्या मुख्य सूत्रधारांना परीक्षेची कागदपत्रे पुरवल्याचा पवारवर ठपका आहे. त्याच्याकडे २६ विद्यार्थ्यांचे पेपर सापडले, त्यापैकी २०जणांनी त्यांच्याकडील पेपर जतन करून ठेवले होते. यापैकी पाच विद्यार्थी टीईटी उत्तीर्ण झाले,अशी प्राथमिक माहिती आहे.जून महिन्यात २८रोजी महाराष्ट्रात टीईटीची परीक्षा होणार होती. तत्पूर्वीच २७ जून रोजीचा पेपर लिक झाला. त्यामुळे परीक्षाही रद्द करावी लागली, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता याला भिवंडी पोलिसांनी यापूर्वीच अटक केली तर काही आरोपी दिल्ली, आंध्र आणि बिहार येथे सापडले.
प्रकाश पवार हा मोहोळ तालुक्यातील जि.प.शाळेत शिक्षक होता. ही नोकरी सोडून त्याने २०२२ मध्ये ध्रुव अकॅडमी ही पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था सुरू केली. सुरुवातीला चांगला प्रतिसादही मिळला, यातून त्याचे नावही झाले. आता मात्र पेपर लिकच्या जाळ्यात अडकला असून मास्तर, प्रशिक्षक ते पेपरफोड्या अशी त्याची ओळख झाली आहे.
What's Your Reaction?