संघ प्रचारक दत्तोपंत म्हसकर यांचे नाव जेजुरी येथील तांत्रिक़ विद्यालयास जाहीर

सोलापूरचे नॉर्थकोट आता सुरेशराव केतकर तांत्रिक विद्यालयासह राज्यातील 51 शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलली; कौशल्य रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभागाची घोषणा

Nov 11, 2026 - 17:18
 0  1
संघ प्रचारक दत्तोपंत म्हसकर यांचे नाव जेजुरी येथील तांत्रिक़ विद्यालयास जाहीर

(विजयकुमार पिसे)
 पुणे : विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय शिक्षणाबाबत आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाने 9 वी आणि 10 वी स्तरावर राज्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयात अभ्यासक्रम सुरू केले आहेत. आता पुढचा टप्पा म्हणजे अशा काही तांत्रिक विद्यालयांचे नव्याने नामकरण केले आहे. संघाचे अ.भा.सहसरकार्यवाह सुरेशराव केतकर यांचे नाव सोलापूरच्या नॉर्थकोटला तसेच पुणे विभागाचे तत्कालिन विभाग प्रचारक स्व. दत्तोपंत म्हसकर यांचे नाव पुणे जिल्ह्यातील जेजुरीच्या तांत्रिक विद्यालयास जाहीर झाले आहे. 
   सध्या दत्तोपंत म्हसकर यांच्या नावाने निगडी प्राधिकरणात स्व.दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्‍वस्त संस्था नावारूपाला आली आहे. सेवा, वाङ्मय, समाजप्रबोधन या त्रिसूत्रीवर आधारित ही संस्था सर्वदूर काम करते.  
   राज्य शासनाने ब्रिटिशकालिन वा अन्य परकीयांच्या  आठवणी पुसून टाकण्याचे घेतलेले धोरण स्तुत्य आणि अभिनंदनीय आहेच. शिवाय देश, देव आणि धर्म,समाज कार्यासाठी वाहून घेतलेले अनेक संघ प्रचारक आहेत, त्यांची ओळख म्हणजे "नाही चिरा, नाही पणती.."  या असंख्य पणतीच्या ज्योतीनी देशभरात सर्वदूर वाड्या,वस्त्या,गाव,पाडे येथे जाऊन काम उभे केले, त्यांच्या कार्याची दखल आता सरकार घेत आहे. याच शृंखलेतील  संघप्रचारक सुरेशराव केतकर आणि दत्तोपंत म्हसकर होय.  
 दत्तोपंत म्हसकरांचा अल्पसा परिचय : शांत मन, स्थिर बुध्दी, विशुध्द भावना, निष्कलंक चारित्र्य या आधारस्तभांवर उभे असलेले स्व. दत्तोपंतांचे जीवन मंदिर आजही अनेकांचे प्रेरणास्थान होय. लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संपर्क आला आणि ते सहजपणे संघकार्याशी एकरूप झाले. अंत:करणात रूजलेली संघनिष्ठा, परिस्थितीची बेचैन करणारी हाक यामुळे स्वाभाविकपणे स्व. दत्तोपंत संघप्रचारक म्हणून बाहेर पडले.
     महाराष्ट्रातील अनेक जिल्हयांमध्ये प्रारंभीच्या काळात संघप्रचारक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर 1972 ते 1994 हा मोठा कालखंड पुणे जिल्ह्यात गेला. प्रारंभी जिल्हा प्रचारक व पुढे पुणे विभागाचे विभाग प्रचारक म्हणून त्यांची अखेरची ओळख. पुणे विभागात अर्थातच  सोलापूऱ जिल्हा या विभागातच येतो. तेव्हा प्रचारक म्हणून दत्तोपंत म्हसकरांचे सोलापूर जिल्ह्यातही वास्तव्य होते. नित्य प्रवास,संपर्क आणि सहवास असायचा. तो काळ आम्हा स्वयंसेवकांचा उमेदीचा कालखंड होता. संघाच्या बैठका,अभ्यासवर्ग,शिबिरा मध्ये दत्तोपंतांचे मार्गदर्शन असायचे. विशेषत: गडकिल्ले, शिवरायांच्या काळातील पराक्रमी इतिहासाचे त्यांनी केलेले वर्णन आजही आम्हा संघ स्वयंसेवकांच्या स्मरणात आहे. राज्य शासनाने जेजुरी येथील तांत्रिक विद्यालयाचे आता दत्तात्रय म्हसकर तांत्रिक विद्यालय जेजुरी असे केले आहे.
     राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विशिष्ट कार्यशैलीतून समाजासाठी सर्वस्व अर्पण करण्याची जी शृंखला आहे, त्या शृंखलेतील एक कडी म्हणजेच स्व. दत्तोपंत म्हसकर. एक धीरोदत्त, सर्वांमध्ये सहजपणे समरस होणारे, जाईल तेथे उत्साह फुलवणारे उमदे व्यक्तिमत्व 7 जुलै 1994 मध्यान्ही अनंताच्या प्रवासास निघून गेले. 
   स्व. दत्तोपंतानी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघविचाराने अनेक सामाजिक प्रकल्पांना गती दिली. त्यांच्या प्रेरणेतून अनेक व्यक्ती, प्रकल्प, संस्था विविध सामाजिक उपक्रमात कार्यरत आहेत. यापैकीच एक निगडी प्राधिकरणात कार्यरत स्मृती संस्था. संघप्रचारक स्व. सुरेशराव केतकर आणि स्व. दत्तोपंत यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow