सावधान.. स्टेट्समुळे आपला जीव धोक्यात, शिवाय घरावर दरोडा
यूट्युब, रिल्स, अॅण्ड मर्डर मिस्ट्री, शेअर मार्केटमुळे कंगाल युवकाची अशीही हिस्ट्री; सोलापूर जिल्ह्याच्या एका गावातील ही आपबिती....
विजयकुमार पिसे | सोलापूर
मोबाईलवर स्टेटस ठेवणे किती महागात पडू शकते, याची धक्कादायक प्रचिती सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील जामगाव येथे आली आहे. कुटुंबीय तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे मोबाईल स्टेटस पाहून एका तरुणाने घरातील सर्वजण बाहेरगावी गेल्याचा अंदाज बांधला. त्यानंतर घरावर दरोडा टाकण्याचा कट रचला. मात्र, घरात प्रवेश केल्यानंतर विरोध करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा खून करून सुमारे अडीच लाख रुपयांचे दागिने घेऊन आरोपी पसार झाला.
ही घटना २६ ऑगस्ट रोजी दिवसाढवळ्या जामगाव येथे घडली होती. अशोक भीमण्णा मुळे (वय ६१) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. या प्रकरणी अजयकुमार चव्हाण (वय ३१) याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कर्नाटकातील कुलबुर्गीजवळील वाडी परिसरातून ताब्यात घेतले आहे.
मोबाईल स्टेटस ठरले दरोड्याचे कारण
पोलिसांच्या तपासानुसार, जामगावातील मुळे कुटुंबीय तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे स्टेटस मोबाईलवर ठेवले होते. हे स्टेटस अजयकुमार चव्हाण याने पाहिले. घरातील सर्व सदस्य तिरुपतीला गेले असावेत, असा त्याचा समज झाला. त्यानंतर त्याने मुळे यांच्या घरावर दरोडा टाकण्याचे ठरविल्याचे तपासात समोर आले आहे.
यूट्यूबवरून शिकला कुलूप तोडण्याचा प्रकार
अजयकुमार याने यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून कुलूप तोडण्याची पद्धत शोधून काढल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार सिरिंजच्या साहाय्याने कुलूपात पेट्रोल टाकून ते पेटविण्यात आले. आगीमुळे कुलूपातील लॉक तुटल्यानंतर त्याने घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून दागिने काढत असताना आवाज झाल्याने अशोक मुळे यांना संशय आला. त्यांनी घरात प्रवेश केलेल्या अजयकुमारला कडाडून विरोध केला. यावेळी आरोपीने घातक शस्त्राने मुळे यांच्या डोक्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अशोक मुळे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने घरातील सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
शेअर मार्केटमध्ये नुकसान; २० लाखांचे कर्ज
पोलिसांच्या माहितीनुसार, अजयकुमार चव्हाण हा शेअर मार्केटमध्ये व्यवहार करत होता. मात्र, त्यात मोठे नुकसान झाल्याने तो सुमारे २० लाख रुपयांच्या कर्जबाजारीपणात अडकला होता. आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मोठी रक्कम मिळविण्याच्या उद्देशाने त्याने दरोड्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी लावला छडा
घटनेनंतर आरोपी कर्नाटकाच्या दिशेने पसार झाला होता. मात्र, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तपासाच्या आधारे त्याचा माग काढला. अखेर कर्नाटकातील कुलबुर्गीजवळील वाडी परिसरातून अजयकुमार चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले. सोलापूर ग्रामीण पोलिस उपअधीक्षक विजय कबाडे यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. आरोपीकडून गुन्ह्याबाबत अधिक माहिती घेण्यात येत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
एका स्टेटसने बदलले सारे चित्र
तिरुपतीला जाण्याची माहिती देणारे काही क्षणांचे मोबाईल स्टेटस आरोपीच्या नजरेस पडले आणि त्यातून दरोड्याचा कट रचला गेला. मात्र, घरात प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने केलेल्या विरोधामुळे या दरोड्याला खुनाचेही स्वरूप आले. त्यामुळे सोशल मीडियावर अथवा मोबाईल स्टेटसवर आपण कुठे जाणार, घर किती दिवस बंद राहणार, यासारखी वैयक्तिक माहिती सार्वजनिक करण्याबाबत नागरिकांनी काळजी घेण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.
What's Your Reaction?