इनकमिंगसाठी पदवीधरचे त्रांगडे, शिक्षकवरही दावा
घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे, ही म्हण इनकमिंगबाबत तंतोतंत लागू होते, असे तूर्तास तरी...
(विजयकुमार पिसे)
पुणे: पदवीधर असो वा शिक्षक मतदारसंघ हे भाजपा विचारसरणीचे गड. बेरजेच्या नादात तिथे वजाबाकी होईल का? यामुळे मूळचे भाजपा विचाराची मंडळी अस्वस्थ झालीत. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात यंदाही वजाबाकीच? या भीतीने इनकमिंगसाठी रेडकार्पेट घालणारे 'दादा' नेते शिंदेसेना वा अजीतदादा गटाबरोबर तडजोड करतील का, अशी शंका उपस्थित होत आहे. कारण.. या ठिकाणी विद्यमान आ.अरुण लाड यांचे पुत्र शरद लाडांसाठी भाजपा नेते आटापिटा करताहेत. तर महायुती म्हणून हसनमियाँनी त्यांचा पिट्टू प्रताप उर्फ भैय्या मानेसाठी आडवा हात घातला आहे. म्हणजे आपला संघर्ष भाजपा कार्यकर्त्यांसाठी नव्हे तर इनकमिंगसाठीच आहे. हे त्रांगडे सुटणार की नाही, हाच तो कळीचा प्रश्न.
भाजपचे राजेश पांडे, माणिक पाटील चुयेकर, मकरंद देशपांडे आणि रोहन देशमुख (सोलापूर) हे भाजपायी पदवीधरसाठी उमेदवारीच्या शर्यतीत. यांच्यासाठी दादा पाटलांचा दावा नाही तर, राष्ट्रवादी आमदारपुत्र शरद लाड यांना ही जागा सुटली पाहिजे म्हणून आग्रही. दादांच्या सर्वच निवडणुकांत या मंडळींनी खस्ता खाल्यात, बहुदा हे विसरलेत की काय?
अशीच गत शिक्षक मतदारसंघाची. ही जागा भाजपा आणि संघ प्रणित शिक्षक परिषद संयुक्तपणे लढत आली आहे. भगवान साळुंके यापूर्वीचे आमदार. गत दोन (टर्म) निवडणुकांत ही जागा आपल्या हातून निसटली. सहा वर्षापूर्वी चंद्रकांत दादांची दुसरी टर्म होती, तेव्हा आ.साळुंके पराभूत झाले, तेव्हा दादा (पहिल्या नव्हे) दुसर्या पसंतीच्या मतांनी विजयी झाले. शिक्षक मधून दत्तात्रय सावंत, गतवेळी काँग्रेसचे जयंत आसगावकर विजयी झाले. आता ही जागा संघ प्रणित शिक्षक परिषदेने लढूच नये, अशी भाजपाची भूमिका दिसते. कारण येथे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडेंसाठी दादा पाटील आग्रही आहेत. गावडेंच्या उमेदवारी निकषात (किमान वय 30 वर्षे) तांत्रिक मुद्दा उपस्थित होत असून भाजपा शिक्षक मतदारसंघात इनकमिंग गावडेंसाठीच आग्रही असा विरोधाभास दिसत आहे.
दरम्यान ही संधी साधून शिंदे सेनेने मंगेश चिवटे (करमाळा) यांच्यासाठी दावा केला आहे. चिवटेनी गेल्या अनेक महिन्यांपासून जनसंपर्क, शिक्षक संघटनांच्या भेटी, मेळावे घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे. ते माघार घेणार नाहीत, अशी स्थिती आहे. इतकेच नव्हे तर चिवटेंनी कर्नाटक भाजपा नेत्यांच्या मध्यस्थीने अमित शाह यांची हुबळीत भेट घेत दबावही आणला आहे. विशेष म्हणजे चिवटेंचे बंधू गणेश भाजपाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आहेत. अर्थात भाजपाची शिक्षक मतदारसंघात 'नुरा कुस्ती' लागलीय? त्यामुळे पुणे पदवीधर असो की शिक्षक मतदारसंघ हे भाजपा विचारांचे गड हा इतिहास होता, असेच समजायचे काय?
What's Your Reaction?