श्रध्देय अशोक जी सिंघल जन्मशताब्दी विशेष

राष्ट्र समर्पित योध्दा अशोक जी सिंघल राष्ट्र उभारणीचे निष्काम तपस्वी आध्यात्मिक साधना, संघटनात्मक कौशल्य आणि सामाजिक समतेचा संदेश देणारे श्रध्देय अशोक जी सिंघल हे समाजकारणातील एक दीपस्तंभ होत. सिंघल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे उलगडलेले विविध पैलू...

Sep 28, 2026 - 23:27
 0  2
श्रध्देय अशोक जी सिंघल जन्मशताब्दी विशेष

एक खूप सुंदर विचार आहे,
वृक्षकबहुँ नहिं फल भखै,
नदी न संचै नीर।
परमारथ के कारने,
साधुन धरा शरीर॥
 ...याचा अर्थ असा की, वृक्ष स्वत:ची फळे स्वत: खात नाही आणि नदी स्वत:चे पाणी स्वत: साठवून ठेवत नाही. दोन्ही इतरांच्या कल्याणासाठीच अस्तित्वात असतात. संत आणि ऋषीमुनी देखील अनंत काळापासून आपल्याला हीच शिकवण देत आले आहेत की, आपल्या सभोवतालच्या लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केलेले जीवन हे वैयक्तिक कर्तृत्वापेक्षा अधिक अर्थपूर्ण ठरते. आपल्या जगण्यात सातत्याने याच भावनेचे प्रतिबिंब असलेले व्यक्तिमत्व म्हणजे श्रध्देय अशोक जी सिंघल.
   २७ सप्टेंबरपासून, आपण आध्यात्मिक साधना, सांस्कृतिक प्रबोधन आणि अनेक दशकांच्या समर्पित संघटनात्मक कार्याचे एकात्मिकरण घडवून आणणार्‍या या महान व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्यासाठी त्यांची जन्मशताब्दी साजरी करणार आहोत.
   अशोक जी यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या स्नेहाची अनुभूती घेण्याच्या अगणित संधी मला लाभल्या, हा मी माझा बहुमानच मानतो. त्यांच्याबाबतच्या माझ्या अगदी सुरुवातीच्या आठवणींपैकी एक आठवण १९८१ मधील. त्यावेळी मी संघटनात्मक जबाबदार्‍या पार पाडणारा एक तरुण कार्यकर्ता. मला त्यांनी स्वहस्ताक्षरात एक पत्र लिहिले होते. तो माझ्यासाठी अर्वणनीय  प्रसंग मानतो. 
अनेक दशके, मी त्यांना पाहिले आहे. गुजरातमधील आदिवासी भागांमध्ये प्रवास करण्याची प्रचंड उत्सुकता त्यांच्यात कायम दिसायची. त्यांचे मन सतत कुठे ना कुठे धावत असायचे; ते सतत समाजातील वंचित घटकांसाठी आणखी काय करता येईल, याचाच विचार करायचे. जेव्हा कधी देशाच्या कोणत्याही भागात नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडायच्या, तेव्हा अशोक जी हे तिथे स्वत: पोहोचणारे किंवा बाधितांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे मधील पहिले असायचेे. २००१ मध्ये कच्छला आलेल्या भूकंपाच्या भीषण परिस्थितीच्या काळात त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव तर मी कधीच विसरू शकत नाही.
   इतरांबद्दलची ही करुणेची आणि काळजी घेण्याची अशोक जींची भावना, त्यांच्या जगण्यात अगदी सुरुवातीच्या काळापासूनच रुजलेली होती. ते एका अत्यंत प्रतिष्ठित आणि संपन्न कौटुंबिक पार्श्‍वभूमीतून आलेले होते. त्यांचे वडील, श्री महावीर, एक नामवंत प्रशासक होते. त्यांचे एक बंधू, श्री बी.पी.सिंघल, पोलीस दलात उच्च पदापर्यंत पोहोचले आणि त्यानंतर ते खासदारही झाले होते. त्यांचे दुसरे बंधू, श्री व्ही. पी. सिंघल, त्रिपुराचे मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील व्यापार आणि कृषी क्षेत्रात मोठे यश मिळवले होते. पण अशोक जी  मात्र अगदी तरुण वयापासूनच एका वेगळ्याच ध्येयाकडे आकर्षित झालेले. भारतमातेच्या लेकरांना त्यांचे वैभव पुन्हा मिळवून देण्याच्या आणि राष्ट्राचे पुनरुत्थान घडवण्याच्या ध्येयाकडे त्यांची दृष्टी असे. 
   प्रयागराजमध्ये लहानाचे मोठे होत असताना अशोक जी संगमाच्या काठावर संगमावर येणारे साधू, संत आणि भाविकही त्यांचे लक्ष वेधून घेत असत. या सगळ्या वातावरणातून भारताच्या सांस्कृतिक जीवनमूल्यांची त्यांना ओळख होत गेली आणि समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची इच्छा अधिक बळकट झाली. इतरांसाठी जगण्याची हीच भावना त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे घेऊन गेली. त्यांच्यावर जेव्हा जेव्हा एखादी जबाबदारी सोपवण्यात आली, तेव्हा ती त्यांनी उत्साहाने आणि कर्तव्यभावनेने स्वीकारली.
अशोक जी सिंघल यांनी सातत्य आणि अथक परिश्रमाने अनेक संस्था आणि चळवळी उभ्या केल्या. त्यांचा आवाज भारदस्त होता आणि त्यांच्या ओघवत्या वक्तृत्वाने संपूर्ण सभा जणू भारावून जायची. सहकारी कार्यकर्त्यांबद्दलची त्यांची आस्था आणि आपुलकीही तितकीच उल्लेखनीय. त्यांच्या संपर्कात आलेल्या कोणालाही त्यांच्या विलक्षण साधेपणाचे कौतुक वाटल्याशिवाय राहायचे नाही. संत समाजाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. ते त्यांच्या सल्ल्याला महत्त्व देत आणि अशोक जींंचे म्हणणेही अत्यंत आदराने ऐकून घेत.
    श्री अशोक जींच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवणारे दोन प्रसंग माझ्या मनात आजही ताजे आहेत. त्यापैकी पहिला प्रसंग १९९३ सालचा आहे. स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे केलेल्या ऐतिहासिक भाषणाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विश्‍व हिंदू परिषदेने अमेरिकेत एका अधिवेशनाचे आयोजन केले होते. परदेशात अशा प्रकारचे अधिवेशन आयोजित करण्याची कल्पना, त्यामागचे नियोजन आणि विविध क्षेत्रांतील लोकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न या सगळ्यांतून अशोक जींचे विलक्षण संघटनकौशल्य दिसून आले होते.
   दुसरा प्रसंग २००० सालचा आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील पोर्ट ऑफ स्पेन येथे जागतिक हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यात सहभागी झालेल्या प्रतिनिधींमध्ये अशोक जींच्या उपस्थितीने किती उत्साह निर्माण झाला होता, हे मला तिथे पाहायला मिळाले. माझे भाषण झाल्यानंतर अशोक जींनी केलेले कौतुक माझ्यासाठी खूप भावणारे होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला नव्या उत्साहाने काम करण्याची प्रेरणा मिळत असे, हे मी पुन्हा एकदा अनुभवले.
  अशोक जी सिंघल यांचा उल्लेख करताना रामजन्मभूमी आंदोलनातील त्यांच्या भूमिकेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. १९९१ मध्ये बोट क्लबवर झालेल्या सभेतील त्यांचे भाषण कोण विसरू शकेल? आंदोलन ऐन भरात असताना जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेतील अशोक जी यांचे ते चित्र आजही कुणीच विसरू शकत नाही. आज अयोध्येत भव्य राममंदिर उभे आहे. हे शक्य होण्यासाठी अशोक जींसारख्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता या कामासाठी आपले आयुष्य वाहून घेतले.
समाजात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण झाले पाहिजे आणि बंधुभावाचा संदेश सातत्याने अधोरेखित केला गेला पाहिजे, यावर त्यांचा ठाम विश्‍वास. सामाजिक एकोपा आणि समतेची भावना दृढ करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. समाजात कोणत्याही प्रकारचा भेदभाव असता कामा नये आणि प्रत्येक व्यक्तीला समान सन्मान व प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, अशी त्यांची धारणा.
  अयोध्येतील राम मंदिराची पहिली वीट ठेवण्याचा मान समाजातील वंचित घटकातून आलेल्या व्यक्तीला मिळावा, असा त्यांचा विचार होता. त्यामुळे बिहारमधील वंचित घटकातून आलेले आणि विश्‍व हिंदू परिषदेचे तळागाळातील कार्यकर्ते असलेले कामेश्‍वर चौपाल यांच्या हस्ते राम मंदिराच्या पहिल्या विटेचे पूजन करण्यात यावे, अशी त्यांची भूमिका होती. काशी येथे आयोजित धर्मसंसदेत त्यांनी डोम राजांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. यानंतर विविध सामुदायिक उपक्रमांमध्ये त्यांनी डोम राजांसोबत काम केले. समाजातील प्रत्येक घटकाला समान सन्मान, प्रतिष्ठा आणि स्थान मिळाले पाहिजे, या त्यांच्या दृढ विचारांचे हे कृतीतून दिसून आलेले उदाहरण होय.
   राष्ट्रनिर्माणाच्या कार्यापलीकडे अशोक जी सिंघल यांच्या जिव्हाळ्याचे आणखी दोन विषय होते; एक म्हणजे शिक्षण, विशेषत: वैदिक शिक्षण आणि दुसरे म्हणजे संगीत. वाराणसीचा खासदार म्हणून मला विशेष अभिमान वाटतो की, मी प्रतिनिधित्व करत असलेली शाश्‍वत काशी नगरी अशोक जी सिंघल यांच्या जीवनाशी एका महत्त्वपूर्ण नात्याने जोडलेली आहे. त्यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले. दुर्गम आणि ग्रामीण भागांपर्यंत, विशेषत: आदिवासी समाजापर्यंत मूलभूत शिक्षण पोहोचवण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या एकल विद्यालय उपक्रमाशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता.
अशोक जी सिंघल हे विपुल वाचन करणारे तसेच उत्तम श्रोते देखील होते. ज्ञानसंपादनासाठी सातत्याने वाचन करण्याची प्रेरणा त्यांनी अनेकांना दिली. अशोक जींना जवळून ओळखणार्‍यांना त्यांच्या उत्तम गायनकौशल्याची निश्‍चितच जाणीव होती. नागपूर येथे झालेल्या काही बैठकांच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. या बैठकांमध्ये ते एकल गीत सादर करत आणि त्यांच्या गायनाने उपस्थित सर्वजण मंत्रमुग्ध होत. त्यांच्या गायनामुळे बैठकीचे वातावरणही एका विशेष उत्साहाने भारून जात असे आणि बैठकीची सुरुवातच एका वेगळ्या ऊर्जेने होत असे. २०१५ मध्ये त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान, त्यांनी उपस्थितांना आश्‍चर्यचकित करत हे मातृभूमि मेरी, हे पितृभूमि मेरी हे गीत गायले. त्यांच्या या अनपेक्षित आणि उत्स्फूर्त गायनाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला आणि तो सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.
   त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अधिकाधिक तरुणांना त्यांच्या महान कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्याचा आपण संकल्प करूया. तसेच, आपल्या राष्ट्राच्या आणि देशवासीयांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी पाहिलेली स्वप्ने साकार करण्याच्या दिशेने कार्य करण्याचा आपला संकल्प पुन्हा दृढ करूया.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow