एमएसईबीच्या एमडी औंडीकर यांची भेट; पारधी समाजातील आयटीआय उत्तीर्ण युवकांना नोकरीसाठी तातडीचे आदेश

अनिल चव्हाण, नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश; अधीक्षक अभियंत्यांना दिले निर्देश

Jun 22, 2026 - 00:14
 0  3
एमएसईबीच्या एमडी औंडीकर यांची भेट; पारधी समाजातील आयटीआय उत्तीर्ण युवकांना नोकरीसाठी तातडीचे आदेश

सोलापूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे (एमएसईबी) व्यवस्थापकीय संचालक (एमडी) श्री. औंडीकर यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी बालाजी सरोवर येथे सोलापूर आदिवासी पारधी समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजातील आयटीआय उत्तीर्ण होऊन एमएसईबीमध्ये इलेक्ट्रिशियन अप्रेंटिसशिप पूर्ण केलेल्या तरुण-तरुणींना अद्याप नोकरीची संधी मिळालेली नसल्याचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अप्रेंटिसशिप पूर्ण करूनही नोकरी न मिळाल्याने अनेक युवक-युवतींवर उपासमारीची वेळ आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण व भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी दिली. यापूर्वी ९ जून २०२५ रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडेही याबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर पालकमंत्र्यांनी एमएसईबी प्रशासनाशी पत्रव्यवहारही केला होता.

या पार्श्वभूमीवर एमडी औंडीकर यांनी तत्काळ उपस्थित असलेल्या सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांना संबंधित युवक-युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पारधी समाजातील आयटीआय उत्तीर्ण आणि अप्रेंटिसशिप पूर्ण केलेल्या युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या नगरसेविका राजश्री चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याची भावना समाजबांधवांनी व्यक्त केली.

यावेळी सिद्धाराम चव्हाण, सुमित चव्हाण, आशुतोष चव्हाण यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow