लातूर : मदतीचा बैल आजारी निघाला; शेतकऱ्यावर उपचाराचा खर्च, प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री हस्तक्षेपाने मिळाला होता नवा बैल; दोन दिवसांतच शेतात बसला खाली
लातूर : निसर्गाच्या संकटाने आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी प्रशासनाने दिलेला बैलच आजारी निघाल्याची घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांना मदत म्हणून देण्यात आलेला बैल शेतीच्या कामासाठी नेताच दोन दिवसांत आजारी पडला. त्यामुळे मदतीऐवजी आता या बैलाच्या उपचाराचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्याच्या माथी पडला आहे.
काशिनाथ गायकवाड यांचा एक बैल वादळी पावसादरम्यान वीज पडून मृत्युमुखी पडला होता. ऐन पेरणीच्या हंगामात शेतीचा आधार हरवल्याने कुटुंबासमोर मोठे संकट निर्माण झाले. शेतीची कामे थांबू नयेत म्हणून गायकवाड यांच्या पत्नीने स्वतः पुढाकार घेत नांगरणी करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून या कुटुंबाबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यात आली.
घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने स्थानिक गोशाळेतून गायकवाड यांना बैल उपलब्ध करून दिला.
मात्र, हा बैल शेतीच्या कामासाठी वापरत असताना दोनच दिवसांत खाली बसला. पशुवैद्यकीय तपासणीत तो आजारी असल्याचे समोर आले. त्यामुळे शेतकऱ्याला पुन्हा एका नव्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
बैल देण्यापूर्वी आरोग्य तपासणी झाली होती का?
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या बैलाची योग्य आरोग्य तपासणी करण्यात आली होती का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सक्षम आणि कामासाठी योग्य बैल देण्याऐवजी घाईघाईत निर्णय घेण्यात आल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकारावर टीका केली आहे. शेतकऱ्यांना मदत करताना केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष उपयोगी मदत मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्याची दुहेरी कोंडी
एका बाजूला नैसर्गिक आपत्तीमुळे बैल गमावलेला शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला आजारी बैलाच्या उपचाराचा वाढलेला खर्च, अशी दुहेरी परिस्थिती गायकवाड कुटुंबासमोर निर्माण झाली आहे. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या मदत प्रक्रियेवर आणि जनावरांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आता प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेऊन शेतकऱ्याला योग्य मदत मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?