सोलापूरचा १२५ वर्षांचा प्रलंबित प्रश्न निकाली
मंत्री बावनकुळे यांची घोषणा, ४०हजार नागरिकांना लाभ, आ.देवेंद्र कोठे यांचा यशस्वी धमाका
मुंबई : सोलापूरच्या कामगार वसाहतींमधील नागरिकांना मालकी हक्क मिळवून देणारा ११८ वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक प्रश्न अखेर राज्य सरकारने मार्गी लावला आहे. सोलापूरमधील 'बी-२' प्रवर्गातील ८१३ मालमत्तांमधील तब्बल ९ हजार कुटुंबांना याचा लाभ होणार आहे, हा अभूतपूर्व निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली.
या जमिनी फ्री-होल्ड व्हाव्यात म्हणून येथील जनता पिढ्यानपिढ्या वाट पाहत होती. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेकांकडे हा प्रश्न गेला, मात्र तांत्रिक अडचणींमुळे तो सुटू शकला नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी माझ्याकडे सोपवली आणि प्रशासकीय पातळीवरील सर्व अडथळे दूर करून यावर शिक्कामोर्तब केले.
तसेच आ.देवेंद्र कोठे आणि पालकमंत्री गोरे यांनी यशस्वी पाठपुरावा केला. आ.कोठे यांच्या मतदारसंघात बी-2प्रभावित मिळकती मोठ्या प्रमाणात आहेत, यामुळे आ.कोठे यांनी पहिल्या दिवसापासूनच लक्ष घातले होते.
आ.कोठे यांच्या प्रयत्नांमुळेच न्याय मिळाला आहे, अशा शब्दांत महसूलमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान मुंबईत याची घोषणा होताच आ.कोठे यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी व नगरसेवक तसेच महापौर कोंड्याल यांनी जल्लोष केला. महापौर कोंड्याल हे अशा चाळीतच राहतात, या निर्णयाचा त्यांना विशेष आनंद झाला.
What's Your Reaction?