...तर 2029 मध्ये परिचारकांना आमदारकीचा योग
...तर 2029 मध्ये परिचारकांना आमदारकीचा योग, पुन्हा पोटनिवडणूक होईल का? राजकीय वर्तुळातील चर्चा
(विजयकुमार पिसे)
विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात उमेदवारीसाठी सर्वाधिक़ दावेदारी प्रशांत परिचारक यांचीच होती. पण ही संधी हुकली. मात्र त्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. 2029 नंतर त्यांना आमदारकीचा योग येईल, असे त्यांच्या समर्थकांचे मत आहे. त्यामुळे तूर्तास नाराजी दूर सारून परिचारक राजेंद्र राऊतांसाठी माजी पालकमंत्री विजय देशमुखांसोबत प्रचारात सक्रिय होते, अशी चर्चा आहे.
आठेक वर्षापूर्वी परिचारक यांनी सांगोल्याचे तुल्यबळ विद्यमान आ.दीपक आबा साळुंके यांची धोबीपछाड केली होती. तेव्हा परिचारकांसोबत स्वत: राजेंद्र राऊत, संजय मामा शिंदे आणि तत्कालिन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची दमदार टीम होती. यावेळी ही संधी राऊतांना मिळाली. प्रारंभी परिचारक नाराज होते. नंतर मात्र नाराजी झटकून ग्रामीण भागात आ.समाधान आवताडे,आ.देशमुख यांच्यासमवेत प्रचारामध्ये सक्रिय झाले, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नीतिन गडकरी देखील परिचारकांना अजिबात अंतर देणार नाहीत, असा विश्वास आहे.
2029 नंतरच का?
राजेंद्र राऊतांचा बार्शी विधानसभा मतदारसंघ आहे. यावेळी (2024) जरांगे फॅक्टरमुळे त्यांची हार झाली. त्यांना या मतदारसंघात ताकद देण्यासाठी मराठवाड्याच्या सीमेवरील बार्शीत ही संधी (विधान परिषद) आहे. 2029 मध्ये लोकसभेसाठी राऊत धाराशिव मतदारसंघात (धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांचे सध्या तळ्यात मळ्यात सुरू आहे) किंवा बार्शी विधानसभा मतदारसंघात आ.सोपलांविरोधात लढतील. ती जिंकली तर राऊतांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, तेव्हा विधान परिषदेच्या रिक्त जागेवर प्रशांत परिचारक यांना संधी मिळेल,असे म्हटले जाते. तेव्हा आमदारकीचा योग आहे. पण आता थोडीशी कळ सोसावी लागेल, असे समर्थकांचे मत आहे. त्यामुळे तूर्तास तरी संधी हुकल्यामुळे परिचारक नाराजी दूर ठेवून सक्रियपणे कार्यरत आहेत.
यदाकदाचित पक्षाने मागील दारातून संधी दिली तर आश्चर्य वाटू नये. कारण प्रशांत परिचारक यांना डावलून त्यांना नाराज करणे अशी भूमिका भाजपा श्रेष्ठींची नाही, असे सांगितले जाते. आ.सुभाषबापूंंचा अलीकडचा एक सुविचार वजा सल्ला असा आहे, क्या खाना, तो दम खाना।
What's Your Reaction?