अजीतदादांना चॅलेंज करणार्या अनगरकरांची भागमभाग
भाजपा तोंडघशी,फुकाची छाती फुगवून फिरणारे नेते गायब
(विजयकुमार पिसे)
अनगर नगर पंचायत व नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध जिंकून अजीतदादांना चॅलेंज करणार्या अनगरकर पाटलांची दुसर्याच दिवशी भागमभाग झाली. भावनेच्या भरात बोलले गेले, 'अनर्थ' घडला. आता 'पार्थ' समजून माझा मुलगा बाळराजेंना पदरात घ्या, अशी आर्त हाक देत राजकारणी पिताजी राजन पाटलांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली.
बेधुंद जल्लोषात काय करतोय, हे ताजं उदाहरण. पण या दिलगिरीनंतर आम्ही मोठा तीर मारला म्हणून फुकाची छाती फुगवणारे स्थानिक भाजपा नेते व पदाधिक़ारी गायबच झाले. जणू आम्ही या गावचे नाहीत.
संपूर्ण महाराष्ट्रात अनगरची निवडणूक बिनविरोध करून भाजपाने बाजी मारली,याचा निश्चित आनंद. अनगरकर पाटलांचे तसे कर्तृत्व आहेच. यात भाजपाने फुकटचे श्रेय लाटण्याचे कारणच काय? मोहोळ तालुक्यातील व स्थानिक भाजपाचे काही पदाधिकारी जणू आम्ही चाणक्य, अशा अविर्भावात आहेत. राजन पाटील अनगरकर परिवार भाजपात आला नसता तरीही, आणि त्यांनी कोणत्याही पक्षाकडून अथवा अपक्ष म्हणूनही एकहाती विजय मिळवणे त्यांना सहज शक्य. हे वास्तव्य. उमेदवारी अर्ज छाननीत उज्वला थिटे यांचा अर्ज अवैध ठरल्यानंतर सायंकाळी अनगरकरमध्ये बाळराजे व राजन पाटील पितापुत्र व समर्थकांंनी बेधुंद गुलाल उधळला. या बेधुंदीत बाळराजेंनी थेट अजीत पवारांना चॅलेंज केले. दादा, आमचा नाद करायचा नाय! अशी एकांगी भाषा आजवर बहुदा पवार परिवाराबाबत कुणी केली नसेल. ते धाडस अनगरकरच करू जाणे. परंतु दुसर्या दिवशी सकाळ उजाडताच अनगरकरांनी चॅनलवाल्यांसमोर जाहीर यू टर्न घेतला. आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, माफी असावी, म्हणत अजीतदादांना साद घातली.
पालघर,अनगर,तुळजापूर आणि सोलापूर भागात असे घाऊक गेटकेन करून आम्ही मोठा तीर मारला, असे काही भाजपा नेते व पदाधिकार्यांना वाटत आहे. (पालघर प्रक़रणात प्रदेश भाजपाला 24 तासात तो प्रवेश रद्द केल्याचे जाहीर करावे लागले.) सगळीकडेच वादग्रस्त आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपींना प्रवेश म्हणजे भाजपाकडे "*सुपर वॉशिंग मशीन" आहे की काय, असा प्रश्न सामान्य भाजपाप्रेमींना पडलाय.
अनगरची निवडणूक़ बिनविरोध होताच जल्लोषाचे विडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले, आणि जेव्हा अनगरकरांनी माफीनामा सादर केला, तेव्हा अनगरकरांना डोक्यावर घेऊन जल्लोषात सामील झालेले सोशल मिडियावरील इन्स्टंट भाजपा नेत्यांची पळताभुई झाली. तोंडघशी पडलेले नेते बुधवारी गायब झाल्याचे पाहायला मिळाले. कष्ट केल्यानंतर "विकास" होतो. इथे तर इन्स्टंट आणि रेडमेड. फुकाची छाती फुगवण्यात कसले कर्तृत्व. त्यासाठी अस्सल अनगरकर आणि बारामतीकरच व्हावे लागते. भाजपाच्या बनचुके पदाधिक़ारी व नेत्यांनी हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा सगळीकडेच तोंडघशी पडण्याची नामुष्की ओढवेल. अशा बनचुके पदाधिकार्यांना प्रदेश भाजपा नेत्यांनी व श्रेष्ठींनी आवर घालण्याची आवश्यकता आहे. अन्यथा...
What's Your Reaction?