काका साठे,उमेश,संतोष पाटील बंधू, जानकर व दीपकआबा पुत्रास दणका

काका साठे,उमेश,संतोष पाटील बंधू, जानकर व दीपकआबा पुत्रास दणका

Feb 10, 2026 - 01:46
 0  167
काका साठे,उमेश,संतोष पाटील बंधू, जानकर व दीपकआबा पुत्रास दणका

(विजयकुमार पिसे)

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यात धक्कादायक निकाल लागले असून ज्येष्ठ नेते माजी जि.प.अध्यक्ष काका साठे,एनसीपीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि त्यांचे बंधू संतोष पाटील तसेच माळशिरसचे आ.उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन यांना मतदारांनी दणका दिला आहे. तसेच माजी आ.दीपकआबा साळुंके (सांगोला) यांचे पुत्र यश पाटील यांनाही धूळ चारली.

*...त्या पाटील बंधूंची हार*

मोहोळ तालुक्यात हॉटेलवर इव्हीएम मशीन सापडल्यानंतर एनसीपीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आक्रमक झाले होते. पण भाजपने दोन सख्ख्या भावांचा दणकून पराभव केला. राष्ट्रवादीचे (एपी गट) उमेश पाटील शिंदे, सेनेच्या संतोष पाटील या दोन सख्ख्या भावांना जबर झटका बसला आहे. उमेश पाटील यांचा कुरूल जि.प.गटात भाजपचे उमेदवार व जकराया साखर कारखान्याचे संचालक सचिन जाधव यांनी 1,303 मतांनी दारुण पराभव केला. तसेच नरखेड गटातून शिंदे सेनेचे संतोष पाटील यांचा भाजपाचेच लखन शिंदे यांनी 528 मतांनी पराभव केला. या निकालामुळे मोहोळ तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. 

    शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम तथा काका साठे यांना राजकीय जीवनात पहिल्यांदाच हार मानावी लागली. बीबी दारफळ गटातून त्यांचा भाजपाचे इंद्रजीत पवार यांनी 4961 मतांच्या फरकाने पराजय केला. माळशिरसचे आ.उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांना भाजपाच्या संस्कृती सातपुते यांनी अनपेक्षितपणे धूळ चारली. अशाच प्रकारे दीपकआबा साळुंके यांचे पुत्र यश साळुंके पाटील यांचा पराभव झाला. उत्तर सोलापूर काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव यांनाही हार पत्करावी लागली. माजी आ.दिलीप माने यांचे पुत्र पृथ्वीराज माने यांनी त्यांना पराभूत केले. माजी सभापती गोपाळराव कोरे यांचे पुत्र अप्पाराव कोरे यांना मंद्रुप गटात प्रथमच पराभवास सामोरे जावे लागले. मळसिध्द मुगळे यांनी कोरेंना धूळ चारली. मोडनिंबमध्ये ज्येष्ठ नेते भारतआबा शिंदे यांच्या पत्नी प्रभावती शिंदे यांनाही धक्का बसला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow