मोहोळ,मंगळवेढा,पंढरपूर,अक्कलकोटला झुकते माप

दक्षिण आणि उत्तर सोलापूर वंचित, भाजपा अध्यक्ष नाना चव्हाणांची टीम जाहीर, काँग्रेसी संस्कृतीचा व्हायरस पसरण्याची भीती

Nov 4, 2025 - 01:17
Nov 4, 2025 - 06:01
 0  58
मोहोळ,मंगळवेढा,पंढरपूर,अक्कलकोटला झुकते माप

(विजयकुमार पिसे)
अध्यक्षपदाला सहा महिने उलटून गेल्यानंतर भाजपाची जिल्हा कार्यकारिणी शशिकांत नाना चव्हाण यांनी जाहीर केली. पण त्यांनी दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर हे दोन तालुके कार्यकारिणीत वंचित ठेवले.

 मोहोळ,मंगळवेढा,पंढरपूर,अक्कलकोट तालुक्याला झुकते माप दिल्याचे कार्यकारिणीची यादी पाहिली तर लक्षात येते.    आठवड्यापूर्वी भाजपात आलेले पेनूरचे चवरे यांना उपाध्यक्षपदाचे गिफ्ट दिले आहे. अशा इनकमिंगसाठीच जिल्हा कार्यकारिणीचा पाळणा लांबवला गेला की काय?
    इनकमिंगबाबत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी जी हतबलता व्यक्त केली होती, तशी अवस्था या नानांची झाली नाही ना?
शशिकांत चव्हाण यांच्या कार्यकारिणीवर नजर टाकली तर ही बाब स्पष्टपणे लक्षात येईल. तसेच पक्षातील क्रिम पदे मर्जी राखणारे आणि लोकप्रतिनिधींचे समर्थक़ आहेत. आकडेवारीच पाहिली तर मंगळवेढा 15, अक्कलकोट 22, पंढरपूर आणि मोहोळ प्रत्येक 19. नानांच्या 81 जणांच्या टीममध्ये जवळपास 70 पदे चार तालुक्यांना आणि उर्वरीत दक्षिण आणि उत्तर सोलापूर अशी विभागणी, असे चित्र दिसते. अनगरकर समर्थक राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे आठवड्यापूर्वीच भाजपात इनकमिंग झाले, लगेच त्यांना जिल्ह्याचे उपाध्यक्षपद मिळाले आहे. काँग्रेस संस्कृतीमध्ये असेच व्हायचे. 


  सोलापूऱ शहर कार्यकारिणीतही असमतोल आहे, निवडणुकीत पक्षविरोधी काम करणार्‍यांना जबाबदारीची पदं मिळाली. पुढे घाऊक गेटकेन सुरू झाले, त्याचे पडसाद फक्त सोलापुरातच नव्हे तर सांगली,नाशकातही उमटत आहेत. सोलापुरात बाळे भागातील काही कार्यकर्ते हीच तक्रार घेऊन सोमवारी पक्ष कार्यालयात आले होते. त्यांनीही मुद्द्याची गोष्ट उपस्थित केली. निवडणुकीच्या तोंडावर ही धुसफूस अशीच सुरू राहिली तर स्वबळावर सगळीकडेच कमळ फुलवणार अशा बाता स्वप्नरंजन ठरू नये. कारण पुण्यात पक्षश्रेष्ठींच्या त्या महत्वपूर्ण बैठकीत सोलापूर 75 पार म्हणजे काय? याचा उलगडा प्रदेश नेत्यांनाही झाला नाही म्हणे. 


   अशीच एक महत्वपूर्ण बैठक लोकसभा निवडणुकीत पंढरपूरमध्ये झाली होती. केंद्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रक़ाश यांना पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ बाबतीत असाच पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला गेला. दक्षिण सोलापूर आणि शहर मध्य डेंजर झोन असा रिपोर्ट कार्ड  शिवप्रकाशजी यांनी दिला. तेव्हा संघ परिवारच्या (प्रबोधन मंच) यंत्रणेकडून दक्षिण सोलापूर व शहर मध्य मतदारसंघात पॅचअप झाले. चिमणी आणि प्रणितीताईंचा करिष्मा चालला नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि जिथे पॉझिटिव्ह रिपोर्ट दिले गेले, तिथे भाजपाचा घात झाला. अन्यथा दिल्लीत 242* प्लस भाजपा हे चित्र अपेक्षितच होते. दुर्दैवाने आता घाउक गेटकेनमध्ये अशीच मंडळी आहेत. लक्ष्मीदर्शनानंतरही त्यांनी  भाजपाला दिलेली 'गॅरंटी'* पाळली नाही. संगठन मे शक्ती है। भाजपा आणि संघ परिवाराची खरी ताकद हे अशा  काँग्रेसी आणि बनचुके नेत्यांच्या लक्षात आणून देण्याची गरज आहे. कारण त्यांनी 'संगठन'*ला चॅलेंज केले आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow