घड्याळाशी नातं जोडणारा नेता अजितदादा अकाली एक्झीट
बारामतीमध्ये विमान अपघातात निधन, गुरुवारी अंत्यसंस्कार; लक्ष्यवेध न्यूज परिवाराची दादांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रध्दांजली
(विजयकुमार पिसे)
राज्याचे तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषविलेले कर्तृृत्ववान नेते अजितदादा पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. घड्याळाशी नातं जोडणारा नेता अजितदादा अकाली एक्झीट झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात शोककळा पसरली आहे. गुरुवारी सकाळी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार आहेत.
बुधवारी सकाळी 8.50 वा. च्या सुमारास बारामतीमध्ये विमान लँडिंग करताना एका शेतात कोसळलं. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आगीने पेट घेतला. आगीत संपूर्ण विमान जळून खाक झालं. याच अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. विमान अपघातात त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीवर कोणालाही विश्वास बसत नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
अजितदादांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरूनच झाली. सकाळी लवकर उठणे ही त्यांची दिनचर्या आज शेवटच्या दिवशी कायम होती. आपल्या दिनक्रमात घड्याळाशी नातं जोडणारा, वेळेचं आणि काळाचं अचूक भान असणारा नेता असे अजितदादांचे व्यक्तिमत्व होते.
अजितदादांच्या विमान अपघाताच्या घटनेवर त्यांचे काका तथा ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राचं कधीही न भरुन निघणारं नुकसान झालं आहे. तसेच हा निव्वळ अपघात आहे. यात राजकारण नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले. यावेळी शरद पवार खूप भावूक झाले होते. त्यांना बोलता देखील येत नव्हतं. तसेच आपण आज मीडियासमोर येणार नव्हतो, असंही शरद पवार म्हणाले.
या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विदीप जाधव (अजित पवार यांचे खासगी सुरक्षारक्षक), सुमित कपूर (पायलट कॅप्टन), संभवी पाठक (कॅप्टन), पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट) अशी मृतांची नावं आहेत. दादांच्या निधनानंतर राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
लोकनेता गमावला : पंतप्रधान मोदींची पोस्ट
श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होत. जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे मेहनती व्यक्तिमत्त्व. प्रशासकीय बाबींची सखोल जाण. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे.
मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अजितदादांशी विशेष स्नेह होता. माझा दमदार आणि दिलदार मित्र हरवला, या शब्दात फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी शासकीय सुट्टी आणि तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला. दादांच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक झाले. माझा मोठा भाऊ गेला असे ते म्हणाले. यावेळी त्यांचा कंठ दाटून आला होता, तर डोळ्यातही पाणी तरळलेलं पाहायला मिळालं.
दादा म्हणाले होते, राजकारण लई वंगाळ...
काही दिवसांपूर्वी चाकण येथील एका जाहीर सभेत अजित पवार यांनी लोकांना राजकारणात पडण्याऐवजी व्यवसाय करण्याबद्दलचा सल्ला दिला होता. ते म्हणाले की, राजकारण लय वंगाळ आहे. जमिनीचे पैसे आले असतील तर राजकारणात पडू नका. धंदा-पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा आणि निर्व्यसनी जीवन जगा.
रा.स्व.संघाची आदरांजली...
महाराष्ट्राचे संघर्षशील लोकनेते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू अत्यंत धक्कादायक आहे. राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची ही मोठी हानी झाली असून, विकासाची दूरदृष्टी असलेला एक रोखठोक लोकनेता आपण गमावला आहे. पवार कुटुंबीयांसह सर्व कार्यकर्त्यांना या मोठ्या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अजितदादांसह अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती! नानासाहेब जाधव,प.महाराष्ट्र प्रांत संघचालक
विश्व हिंदू परिषदेची श्रध्दांजली..
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने अजित पवार यांच्या निधनाबद्दल श्रध्दांजली वाहण्यात आली. विहिंप प.महाराष्ट्र प्रांताची बैठक़ बुधवारी रात्री पार पडली. यावेळी प्रांत सहमंत्री अॅड.सतीश गोरडे यांनी, अत्यंत उमदा व तडफदार नेतृत्वास महाराष्ट्र मुकला,या शब्दात शोक व्यक्त केला. याप्रसंगी मुंबई क्षेत्र मंत्री रामचंद रामुका,प्रांत मंत्री किशोर चव्हाण,सहमंत्री नितीन वाटकर तसेच प्रांत,विभाग आणि जिल्हा स्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?





