'FDA'चे कर्मचारी म्हणजे खाल्ल्या घरचे; अशा नाठाळांच्या माथी मुंढेंनी काठी हणावीच

तुकाराम मुंढेंच्या स्वच्छता मोहिमेला FDA स्टाफचा खीळ, सुस्तावलेली व्यवस्था; कामाचा बोजा वाढला म्हणून बंडोबांची मंत्री झिरवळांकडे धाव

Jul 31, 2026 - 03:08
 0  1
'FDA'चे कर्मचारी म्हणजे खाल्ल्या घरचे; अशा नाठाळांच्या माथी मुंढेंनी काठी हणावीच

(विजयकुमार पिसे) 
    FDA अर्थात राज्य अन्न व औषध प्रशासन विभाग, तसा कायम सुखावलेला आणि सुस्तावलेला. म्हणून अन्न औषधात हमखास भेसळ. त्यासाठी ह्या विभागाचाच आशीर्वाद असतो असं म्हणतात. भेसळखोरांना चाप बसवण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी काठी उगारली, ज्यामुळे  सामान्य जनता मुंढेंच्या पाठिशी आहे. पण त्यांच्या एफडीए विभागाच्या स्टाफने बंड पुकारलाय आणि त्यांनी मुंढेंच्या विरोधात थेट मंत्री नरहरी झिरवळांकडे तक्रार केली आहे. असे नतद्रष्ट् FDA कर्मचारी म्हणजे खाल्ल्या घरचे... होय! त्यामुळे अशांच्या माथी मुंढेेंनी काठी हणावीच, अशा भावना सामान्य जनतेमधून व्यक्त होत आहेत.
   तुकाराम मुंढे जेथे जातात, तिथे सगळी व्यवस्थाच ताठ होते. सुस्तावलेल्या FDAच्या स्टाफची ड्यूटी सकाळी ९ ते रात्री १२ पर्यंत वाढवली आहे. सुट्या देखील बंद केल्या म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील कर्मचारी  तुकाराम मुंढेंच्या कारभाराविरोधात आक्रमक झाले आहेत. अर्थात मुंढेंच्या स्वच्छता मोहिमेस ब्रेक लावण्याचा प्रयत्न म्हणजे एक प्रकारे भेसळखोरांना साथ देण्यासाठी कट असावा, अशी पुष्टी यामुळे मिळते.
     राज्य अन्न व औषध प्रशासनाच्या छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेतील स्टाफमध्ये हा असंतोष उफाळून आला आहे. प्रयोगशाळेचे सहसंचालक तुकाराम मुंढे यांच्या विरोधात २९ अधिकारी आणि कर्मचारी आक्रमक झाले  आहेत. कामाची सक्ती, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही ड्यूटी या स्टाफला नकोय. या प्रयोगशाळेत तांत्रिक काही पदे आधीपासूनच रिक्त आहेत.  तरीही मुंढे यांनी तगादा लावला. दोन शिफ्टमध्ये काम सुरू केले. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक ताण वाढलाय. शिवाय या मोबदल्यात अतिरिक्त भत्ते, सुविधा देखील नाहीत.
वास्तविक या खात्याच्या कर्मचार्‍यांनी यापूर्वी किती भेसळखोरांवर धाडी घातल्या? तपासणी केली? कारवाई केली? असेल तर अपवादात्मक. ते देखील जुजबी आणि केवळ देखावाच. मुंढे यांनी थेट भेसळखोरांवर काठी उगारली. मात्र त्याचा वर्मी प्रहार FDA कर्मचार्‍यांवरच बसला असावा. म्हणून कुरकूर सुरू आहे. तमाम भेसळखोर मुंढेे यांच्या बदलीसाठी खटाटोप करताहेतच. त्यांना साथ देणार्‍यांमध्ये बहुदा एफडीएचा एक गट देखील सक्रिय असावा. मंत्री झिरवळ यांनी आपली प्रतिमा जपण्यासाठी मुंढे यांना पाठिंबा  द्यावा, जेणेकरून अन्न आणि औषध हे त्यांचे खाते स्वच्छ होईल. अन्यथा.. भेसळखोरांबरोबर मं...देखील, असे मुळीच नकोय.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow