सेवेपासून "शिखऱ" गाठण्याचा त्यांचा संकल्प!...आणि आम्ही स्वागतासाठी 'रेडकार्पेट'!!

सोयीसाठी; हिंदू दहशतवाद.. पार्सल.. आणि आता हिंदुत्वाचा साक्षात्कार; म्हणून अखंड सावधान

Sep 19, 2026 - 00:17
 0  152
सेवेपासून "शिखऱ" गाठण्याचा त्यांचा संकल्प!...आणि आम्ही स्वागतासाठी 'रेडकार्पेट'!!

(विजयकुमार पिसे)
    देशाचे एक हसमुख गृहमंत्री हिंदू दहशतवादाची व्याख्या करतात. एक खासदार, 'संविधान खतरे मे' म्हणत जंतरमंतरवर, राम मंदिर चढावा, साधु संत, देशाचे प्रधानमंत्री यांच्यावर सतत टीका टिपणी, त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांची 'पार्सल' परत पाठवण्याची भाषा, दरम्यान त्यांच्या काही  पक्ष कार्यकर्त्यांना हिंदुत्वाचा साक्षात्कार होतो. २०२४ मध्येच भाजपा पक्ष प्रवेशाचे सोहळे, स्वयंसेवक म्हणून पण दावा.. आमदार, नगरसेवक, अन्य महत्वाची पदं, पक्षातही मोठी जबाबदारी. हे चित्र केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात, देशभरातही. आता  २०२९ चे वेध.. म्हणून 'लक्ष्यवेधी' विमर्श, नॅरेटिव्ह. 
   म्हणजे याच कुटुंबातील सदस्याचा नातू, भाचा यांचा सेवेपासून "शिखऱ" गाठण्याचा संकल्प आहे. तर भाजपाचे जबाबदार पदाधिक़ारी, नेतेमंडळी आम्ही स्वागतासाठी सज्ज  आहोत, अशी विधानं  करतात. असो..
    १७ सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ७६ वा वाढदिवस. यानिमित्त १७ ऑक्टोबरपर्यंत देशभरात 'सेवामास' संकल्प आहे. त्याचा श्रीगणेशा म्हणून १७ रोजी सर्वत्र दीपोत्सव. मोदींच्या आयुरारोग्यासाठी महाआरती, सेवायज्ञ, रक्तदान शिबीर असे अनेकविध उपक्रम झाले. हे अपेक्षित आणि स्वागतार्ह आहे. देशवासीयांनीही मोदींच्या शतायुषीसाठी प्रार्थना केली. देशविदेशातील महामहिम यांनी देखील मोदींना सुयश चिंतले. कारण प्रधानमंत्री मा.मोदींचे कर्तृत्वच संपूर्ण विश्वभरात त्या उंचीचे आहे.
   सोलापूर लोकसभा मतदारसंघातून २०२४ मध्ये महास्वामींचा आशीर्वाद असताना येथे 'उपरे'पण लादले. आपल्याच पैकी काही जणांनी 'नादान'पणा केला. हा वर्तमान आणि भूतकाळ.
   २०२९ मध्ये अशी चूक करायची नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. (1996, 2004, 2014, 2019 सारखा पुन्हा इतिहास घडवायचा आहे) "शिखर" गाठण्याच्या नादात "आयात पार्सल" घ्यायचे का? हा कळीचा मुद्दा आहे. म्हणून एक म्हण आहे... स्वागताच्या नादात 'घरचं झालं थोडं...आणि.. धाडलं...।' (जे आधीच जास्तीचं, अजीर्ण आहे) त्यामुळे निष्ठावंत घराबाहेर आणि बाहेरच्यांना (इनकमिंग) गालिचा अशी आजची स्थिती आहे. काळजी घेण्याची आवश्यकता. अन्यथा 'काँ.'मुक्तच्या नार्‍यात...तुम्ही देखील त्याच रांगेत..!
    गुरुवारी १७ रोजी शहरात तब्बल ७६ डिजीटल लक्ष वेधून घेणारे लागले म्हणे. काही भाजपाई या 'शिखर'मय डिजीटल फलकांमुळे हरखून गेले. आनंदाच्या उकळ्या फुटल्या. 'शहर मध्ये'च सापडला सापडला, अशा प्रतिक्रिया देखील होत्या; ...ते येणार ना, अशी चर्चा, कुजबूज सुरू झाली. ..तर त्यांचे स्वागतच करू म्हणत अतिउत्साही स्टेटमेंटही गेले. असो..
   येतात तर येऊ द्या! 'वसुधैव कुटुंबकम', 'हे विश्‍वची माझे घर' हा सहिष्णु भाव जपताना समर्थ रामदासांनी सांगितलंय.. अखंड सावधान, दक्ष...।

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow