शीख दंगलीतील दोषी काँग्रेस खा.सज्जनकुमारना मनपा सभेत श्रध्दांजली!

राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची तीन भाजपा खासदारांना तंबी, समन्सही बजावून स्पष्टीकरणही मागितले होते, मोदी सत्तेत आल्यानंतर दंगलीची एसआटी चौकशी, त्यामुळे सज्जनकुमारना जन्मठेप; भाजपा नेते अ‍ॅड.फुल्का म्हणाले, भाजपा खासदारांची ती भूमिका म्हणजे पीडित शीख बांधवांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार

Sep 16, 2026 - 16:20
 0  101
शीख दंगलीतील दोषी काँग्रेस खा.सज्जनकुमारना मनपा सभेत श्रध्दांजली!

(विजयकुमार पिसे)

१९८४ शीख दंगलीतील दोषी क़ाँग्रेस खासदार सज्जनकुमार कारागृहात मरण पावले. ही घटना २० ऑगस्टची (२०२६). यावेळी अंत्यविधी शोकसभेस उपस्थित भाजपाच्या तीन खासदारांना राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी तंबी दिली, ही घटना ताजी असतानाच सोलापुरात भाजपाची सत्ता असलेल्या मनपा सभेत (१५ सप्टेंबर २०२६) काँग्रेस खा.सज्जनकुमार यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर मनपा सभा तहकूब देखील केली. मनपाची दरमहा सर्वसाधारण सभा भरते. मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी पार पडली. तेव्हा महापौर विनायक कोंड्याल यांनी सज्जनकुमार यांच्यासह अन्य यांच्या दुखवट्याचा प्रस्ताव मांडून सभा तहकूब केली. 

   सज्जनकुमार निधन संदर्भात आजही भाजपची भूमिका कठोर आणि स्पष्ट आहे. कारण १९८४ च्या शीख विरोधी दंगलप्रक़रणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. तसेच त्यांना शिक्षाही झाली. तुरुंगात शिक्षा भोगत असतानाच काँग्रेसचे माजी खा. सज्जन कुमार (वय ८०) निवर्तले. त्यांच्या निधनानंतरही भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका ही अत्यंत कठोर आणि आक्रमक राहिली आहे. पण सोलापुरात पक्षीय धोरण विरोधाभास दिसून आला.

     भाजपचे प्रवक्ते यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हटले की, ज्या व्यक्तीला न्यायालयाने हजारो निष्पाप शिखांच्या हत्येचा कट रचल्याबद्दल आणि दंगली भडकावल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा दिली होती, त्याचे काँग्रेस कौतुक करत आहे. राहुल गांधी यांची मोहब्बत की दुकान ही केवळ एक ढोंग आहे, असे भाजपने म्हटले. तसेच पीडित शीख बांधवांना न्याय मिळवून देण्यात भाजपाचा वाटा आहे. कारण मोदी सरकारने २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून या प्रकरणाची पुनर्रचना केली, ज्यामुळे सज्जन कुमार सारख्या बड्या नेत्यांना तुरुंगात जावे लागले. दरम्यान सज्जनकुमार यांच्या निधनानंतर दिल्लीतील भाजपचे तीन खासदार रामवीर सिंग बिधुडी, कमलजीत सहरावत आणि योगेंद्र चंदोलिया हे अंत्ययात्रेस उपस्थित होते. तसेच त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वनही केले. तेव्हा पक्षाने ही भेट विवादास्पद असल्याचे नमूद करून त्यांची कान उघाडणी करून तंबी दिली होती.

     दरम्यान भाजपाचे वरिष्ठ नेते आणि शीख दंगल पीडितांसाठी न्यायालयीन लढा देणारे वकील एच.एस.फुल्का यांनी समाजमाध्यमावर नाराजी व्यक्त करून त्या तीन खासदारांवर कारवाईची मागणी केली होती. शीखांचा मारेकरी तुरुंगात राहावा, याची काळजी भाजपाने घेतली. दंगल पीडित शीख बांधव आजही १९८४ च्या त्या काळ्या आठवणी घेऊन जगत आहेत. त्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. इतक्या तीव्र संवेदना भाजपाच्या आहेत. ही वस्तुस्थिती असताना भाजपा सत्तेत असलेल्या मनपा सभेत दंगलखोर सज्जनकुमारना श्रध्दांजली वाहण्यात आली, याविषयी आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

  *जाता जाता* : मुंबई बॉम्बस्फोट किंवा अन्य अशा वादग्रस्त घटनासंदर्भात भाजपाची विचारधारा स्पष्टच आहे. तेव्हा इतिहास किंवा विचार, पक्षीय धोरण माहीतच नसेल तर सोलापुरात (भाजप)जो प्रकार घडला, तेव्हा आपलेच ओठ.... अशी अवस्था होऊ शकते...!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow