Dj, Dolby, गुलाल मुक्तीची ३६वर्षे, सोलापुरी 'ताता गणपती'चा पॅटर्न

पूर्व भाग म्हटलं की अनेक जण नाकं मुरडतात, पण अनेक आदर्श संकल्पनांचा श्रीगणेशा इथूनच तर झालाय, त्याची लक्ष्यवेधी दखल

Sep 16, 2026 - 00:01
 0  73
Dj, Dolby, गुलाल मुक्तीची ३६वर्षे, सोलापुरी 'ताता गणपती'चा पॅटर्न

 (विजयकुमार पिसे)
 सोलापुरातील पूर्व भागाने उद्योग, रोजगार, शिक्षण, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात नेहमीच झेंडे रोवले आहेत. पूर्व भागाविषयी अनेकजण हेतुत: नाकं मुरडतात. परंतु अनेक आदर्श संकल्पनांचा श्रीगणेशा इथूनच तर झालाय. गणेशोत्सवात 'आव्वाज' कुणाचा असा कान फुटेस्तोवर भोंगा वाजवला जातोय. यंदा पुण्यात चक्का राडा  झाला. काही जणांनी पुण्यात सोलापुरी पॅटर्नचा जाहीरपणे दावा देखील केला. सोलापुरात अशा आदर्श संकल्पना ३६ वर्षांपासून 'ताता (आजोबा) गणपती' मंडळ जोपासतंय, हे अभिमानास्पद आहे.असो..  
  १९८० च्या दशकात श्री मार्कंडेय चौक तरुण मंडळाला पूर्व विभाग प्रमुख मानाचा ताता गणपतीचा सन्मान मिळाला. १९९० मध्ये येथील उद्योजक स्व.राजमोगली आशय्या आरकाल यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालिन पदाधिक़ार्‍यांनी   युवकांच्या हाती (तेव्हाचे 'Gen Z') श्रीमूर्तीसह मंडळ सोपवले. आज श्री मूर्तीची ८० किलो चांदीची आभूषणे, श्रीची अभिषेक मूर्ती आणि सुमारे १ किलो सोन्याचे दागिने असा खजिना आहे. तेव्हापासून डीजे, डॉल्बी आदी कर्णकर्कश्य वाद्यांना फाटा दिला आहे.
   पुढे एकेक पाऊल टाकत १९९७ मध्ये रवींद्र राजमोगली आरकाल यांच्या संकल्पनेतून 'पूर्व विभाग प्रमुख मानाचा ताता गणपती सांस्कृतिक मंडळ' असा नामविस्तार झाला. त्याचबरोबर मोठ्या आवाजाची वाद्ये 'डीजे, डॉल्बी' न लावण्याचा संकल्प केला. 'ताता गणपती'समोर सकाळ, संध्याकाळ फक्त भक्ती गीतं वाजवली जातात. २००१ पासून गुलालही उधळला जात नाही. श्री प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणुकीत डीजे व डॉल्बीला पूर्णपणे फाटा दिला आहे. लेझीम, ढोल, झांज पथक, लहान मुलांचा वारकर्‍यांचा टाळमृदंग अशी पारंपरिक पध्दतीने मिरवणूक निघते. त्यामुळे शिस्तबद्ध मिरवणुकीचे पोलीस आयुक्तालयाकडून तब्बल सहा वेळा विघ्नहर्ता पुरस्कार अशी डबल हॅट्ट्रीक मिळवली आहे.
   याशिवाय सर्वोत्कृष्ट सजावटीचा प्रथम क्रमांकाचा पंचवीस हजार रुपयांचा 'बाप्पा माझा' पुरस्कार अशा अनेक  सन्मानाची परंपरा आजतागायत कायम राखली आहे. यंदाच्या वर्षीे अध्यक्ष सुहास पोला, सचिव गोविंद केंची यांच्याकडे मंडळाची धुरा आहे, अशी माहिती मंडळाचे ज्येष्ठ पदाधिक़ारी व या सर्व घटनांचे साक्षीदार सामाजिक कार्यकर्ते  गौरीशंकर कोंडा यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow