महायुतीचा सोलापुरात चौकार सोलापूर शहर मध्यने दिला मोका; फुलणार कमळच

लक्ष्यवेध...
महायुतीचा सोलापुरात चौकार
सोलापूर शहर मध्यने दिला मोका; फुलणार कमळच
(विजयकुमार पिसे)
सोलापूर : अपेक्षेप्रमाणे भाजपाने सोलापूर शहर मध्य मतदारसंघात *मोका* दिला, त्या संधीचे सोने मतदारांनी केले. याशिवाय शहर उत्तर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या मतदारसंघातही महायुती *चौकार* मारणार आहे. शनिवारी मतमोजणीनंतर कमळ फुलणार आणि भगवा गुलाल उधळणार. आणि धक्कादायक बाब म्हणजे शिंदे-पवार रणनीतीने सोलापुरातून हाताचा पंजा गायब होण्याची चिन्हे आहेत.
तिकीट वाटपाच्या हिशेबात शहर मध्य मतदारसंघ भाजपाला मिळवणे ही आग्रही भूमिका लक्ष्यवेधने मांडली होती. हा नॅरेटिव्ह परफेक्ट झाला. आणि भाजपाने नवा चेहरा देवेंद्र कोठे यांना उमेदवारीही दिली. शहर मध्य मतदारसंघ सोलापुरातील अन्य मतदारसंघाचा सुवर्ण-मध्य आहे. त्यामुळे शहर उत्तर विजयकुमार देशमुख, दक्षिण सोलापूर सुभाषबापू देशमुख आणि अक्कलकोटमधून जिल्हा अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी हे तीनही विद्यमान आमदार आणि देवेंद्र कोठे चौकार मारणार हे निश्चित. (लक्ष्यवेध न्यारेटिव्ह)
लोकसभेपाठोपाठ सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने सारे काही पॅचअप करून जागावाटपाचे सुनियोजन केले. त्यामुळे कमी अधिक़ प्रमाणात असलेली नाराजी लवकरच संपली. याउलट आघाडीत बिघाडी कायमच राहिली. काँग्रेस आणि शा.प.पक्षाने त्यांच्याच उमेदवारांचा आणि घटक पक्षांचा विश्वासघात केला. त्यामुळे शहर मध्य मतदारसंघात आडम मास्तर यांनी काँग्रेस महाआघाडी विरोधात लाल निशाण फडकवले. दक्षिण सोलापुरात सांगली पॅटर्नवर सोलापुरी पॅटर्न भारी ठरला. शिवसेना एकाकी लढली, परिणामी महाआघाडीला दोन मतदारसंघात ठाकरे सेनेच्या मशालीने आग लावली. शिंदे-पवार प्रेमी काडादी यांनी आघाडीलाच धर्मसंकटात टाकले. (सप्टेंबरच्या लक्ष्यवेधमध्ये काडादींमुळे धर्मसंकटात कोण? हा नॅरेटिव्ह मांडला होता.) तसेच ठाकरे सेनेच्या कडव्या शिवसैनिकांनी शहर उत्तर मध्ये तुतारीची कोंडी केली. तिकडे अक्कलकोट मतदारसंघात सारे काही आलबेल असताना अप्पांनी घात केला. त्यांनी उघडपणेच केले हे बरे झाले. शहर उत्तरमध्येही त्यांनी अपक्ष लढवून भाजपाला सरळ आव्हान दिले. खंजीर खुपसण्याची शा.प.ची परंपरा यावेळीही कायम राहिली.
काल मतदानाच्या दिवशी सुशीलकुमार आणि खा. प्रणितीताई शिंदे यांनी उघड उघड आपला धर्म सांगून अधर्म कसा पाळावा याचे (आदर्श!) उदाहरण घालून दिले. या घडामोडीत शहर उत्तर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट हे काँग्रेसचे बालेकिल्ले धोक्यात आले आहेत. हाताचा पंजा घालवण्याची नामुष्की ताई काँग्रेसच्या खासदार असताना ओढवली, हा देखील लक्ष्यवेधी नॅरेटिव्ह आहे.
What's Your Reaction?






