भाजपाची डीसीसीवर एकहाती सत्ता; पण क्रॉसव्होटींगचा शिक्का! शिंदेंची चिवट झुंज, तरीही देशमुख तरले

...म्हणून निवडणूक निकालानंतर गद्दार गद्दारच्या घोषणा, तालुकानिहाय मतमोजणीतून भाजपमध्ये गद्दार कोण याचा शोध घेणार? आता लक्ष बँकेचा चेअरमन कोण? यंग जनरेशनच्या हातात जिल्ह्याची अर्थसत्ता, माजी आमदाराचे नातू, नातसून पराभूत, हे देखील या निवडणुकीचे वैशिष्ट्य

Nov 28, 2026 - 00:40
 0  90
भाजपाची डीसीसीवर एकहाती सत्ता; पण क्रॉसव्होटींगचा शिक्का! शिंदेंची चिवट झुंज, तरीही देशमुख तरले

(विजयकुमार पिसे)
  सोलापूर जिल्ह्याची अर्थसत्ता अकलूजकरांच्या हातात हे एकेकाळचे चित्र, डीसीसी बँकेच्या निवडणुकीने त्यास छेद लागला. शिवाय प्रथमच भाजपाची एकहाती सत्ता आली. पश्‍चिम महाराष्ट्रात सहकारात भाजपाचा हा नॅरेटिव्ह प्रस्थापित झाला खरा, पण त्याचबरोबर क्रॉस व्होटींगमुळे पक्षातील गद्दारी देखील अधोरेखित झाली. शिंदे सेनेचे अमोल शिंदे यांची चिवट झुंज, तरीही मनीष देशमुख तरले. त्याचबरोबर माजी मंत्री व आमदार गणपतराव देशमुखांचे नातू आणि भाई एस.एम.पाटील यांची नातसून या निवडणुकीत पराभूत झाले, हे देखील या निवडणुकीचे वैशिष्ट्य होय. 
   तब्बल आठ वर्षानंतर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली, शुक्रवारी 27 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागला, यामध्ये 9पैकी आठ जागा भाजपाने एकहाती जिंकल्या, यापूर्वी 10 जागा अविरोध झाल्या असून बँकेचे चेअरमन प्रथमच अक्कलकोट तालुक्याला मिळणार की पंढरपूर आणि बार्शी तालुका दावा करणार हे नजीकच्या काही दिवसात स्पष्ट होईल. 
   **शोध व बोध घेणार?
 डीसीसी बॅंकची निवडणूक ओबीसी जागेवर खुल्या गटाने ठोकलेली मांड आणि आ.सुभाष देशमुख यांचे सुपुत्र मनीष भैय्या देशमुख आणि शिंदे सेनेचे अमोल बापू यांची लढत लक्ष्यवेधी ठरली. आज निकालानंतर क्रॉस व्होटींगमुळे अंतर्गत गटबाजी समोर आली. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी क्रॉस व्होटींग करू नका, असे बजावले असताना सुध्दा सोलापूर शहर, दक्षिण सोलापूऱ, मंगळवेढा, करमाळा अक्कलकोट तालुक्यांमधून अमोल शिंदे यांना अनपेक्षित मते मिळाली. त्यामुळे पराभूत होऊन सुध्दा निकालानंतर अमोल बापूंच्या चिवट झुंजीची चर्चा रंगली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खा. धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांचे बंधू माजी आ.रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनेलने एकमेव जागा जिंकली, ती देखील माळशिरसची. येथून त्यांचे बंधू अर्जुनसिंह विजयी झाले. तसेच नागरी बँका व पतसंस्था मतदार संघात भाजपच्या सहकार विकास पॅनलचे मनीष देशमुख विजयी झाले, वास्तविक ही निवडणूक एकतर्फी अपेक्षित होती.  मात्र दोघांच्या मतांचा फरक केवळ 28 दिसला,तेव्हा त्यांच्या समर्थकांनी गद्दार,गद्दारच्या  घोषणा दिल्या. त्यामुळे क्रॉस व्होटींग झाले, पक्षातील गटबाजीचा (विशेषत: नवे/जुने) शिक्का देखील बसला. त्यामुळे क्रॉस व्होटींग करून शिंदे सेनेचे अमोल शिंदे यांना मदत करणारे, भाजपमधील गद्दार कोण? याचा शोध लागणार का आणि बोध घेणार का? हा सवाल आहे.
   **नातू व नातसून पराभूत
देशमुख आणि शिंदे यांना कुठे कुठे मते मिळाली, ही आकडेवारी अधोरेखित होते, की क्रॉॅस व्होटींग झाले आहे. सोलापूर शहरात मनीष देशमुख (66) अमोल शिंदे (97), दक्षिण सोलापूरमध्ये 14 पैकी दोघांना प्रत्येकी 7 मते, मंगळवेढ्यात देशमुख (11)शिंदे (27) करमाळा देशमुख (11) शिंदे (9) आणि अक्कलकोटमधून देशमुख (13), शिंदे  (8) अशी मत विभागणी आहे. माजी मंत्री व आमदार गणपतराव देशमुखांचे नातू डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख पराभूत, तर त्यांचे बंधू आ.बाबासाहेब (शेकाप) भाजपा पॅनलमधून विजयी तसेच माजी आ.भाई एस.एम.पाटील यांची नातसून सिंधू सुरेश पाटील (महिला  प्रतिनिधी गट) या पराभूत झाल्या. आता मोहिते पाटलांचा फक्त चंचुप्रवेश झाला, तर दिलीप सोपल, शिवदारे, सिद्रामप्पा पाटील,भाई एस.एम.पाटील,चाकोते ही प्रस्थापित घराणे डीसीसी बँकेसाठी सीलबंद झाली आहेत. कायम की तात्कालिक हे भविष्यात कळेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow