पवन राजेनिंबाळकर हत्याकांडाचा निकाल; पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष मुक्त

पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा २० वर्षांनंतर अखेर निकाल लागला असून मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने १२७ साक्षीदारांचे जबाब तपासल्यानंतर माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीत गंभीर विसंगती आढळल्याचे नमूद केले. तसेच तपासातील त्रुटी, पुराव्यांचा अभाव आणि आरोपांना पूरक दस्तऐवज नसल्यामुळे आरोपींना दोषी ठरवणे शक्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणावर अखेर न्यायालयीन पडदा पडला आहे.

Jun 20, 2026 - 15:27
 0  189
पवन राजेनिंबाळकर हत्याकांडाचा निकाल; पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष मुक्त

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील बहुचर्चित आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा अखेर २० वर्षांनंतर निकाल लागला आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी (२० जून) माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.

निकाल सुनावताना न्यायालयाने या प्रकरणातील तपास, साक्षी आणि पुराव्यांचा सविस्तर आढावा घेतला. एका लोकनेत्याची राजकीय वैमनस्यातून हत्या होणे आणि त्यासाठी न्याय मिळण्यास तब्बल दोन दशके लागणे ही अत्यंत वेदनादायक बाब असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली.

१२७ साक्षीदारांची तपासणी

या खटल्यात न्यायालयाने एकूण १२७ साक्षीदारांचे जबाब तपासले. सुरुवातीला राजकीय वैमनस्यातून हा कट रचल्याचा तपास यंत्रणांचा दावा होता. मात्र, न्यायालयाने नमूद केले की, संपूर्ण खटल्याचा पाया माफीच्या साक्षीदाराच्या जबाबावर उभा होता आणि त्याच्या साक्षीत अनेक विसंगती आढळून आल्या.

न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, संबंधित साक्षीदाराचा प्रारंभीचा जबाब दबावाखाली आणि मारहाणीच्या पार्श्वभूमीवर नोंदवला गेल्याचे दिसून आले. तसेच त्याने केलेल्या अनेक दाव्यांना कोणताही स्वतंत्र पुरावा उपलब्ध नव्हता.

तपासातील गंभीर त्रुटींवर न्यायालयाचे ताशेरे

न्यायालयाने सीबीआयपूर्वी झालेल्या पोलिस तपासावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आरोपींचे मोबाईल फोन जप्त न करणे, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपास न करणे, अटक प्रक्रियेत आवश्यक नोंदींचा अभाव अशा अनेक त्रुटींचा उल्लेख निकालात करण्यात आला.

तपासात आरोपींनी विविध ठिकाणी रेल्वेने प्रवास केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, त्या दाव्याला पूरक असे कोणतेही ठोस दस्तऐवजी पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले नाहीत.

राकेश मारिया यांचाही उल्लेख

निकालादरम्यान न्यायालयाने तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी राकेश मारिया यांच्या नावाचाही संदर्भ घेतला. एका साक्षीदाराने आपण मारिया यांना भेटल्याचा दावा केला होता. मात्र, त्या कथनालाही कोणताही विश्वसनीय पुरावा नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

२० वर्षांच्या खटल्यानंतर पडदा

राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या गेलेल्या या प्रकरणात अनेक वर्षे सुनावणी सुरू होती. अखेर सबळ पुराव्यांचा अभाव, साक्षीतील विसंगती आणि तपासातील त्रुटी यामुळे न्यायालयाने पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

या निकालामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा या बहुचर्चित हत्याकांडाची चर्चा रंगली असून, दोन दशकांनंतर या प्रकरणावर न्यायालयीन पडदा पडला आहे.

हे आरोपी निर्दोष सुटले

पद्ममसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ल, शशिकांत कुलकर्णी, कैलाश यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटे पांडे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow