राऊतांचा ज्यांच्यावर विश्वास, त्या नेत्यालाच हकाललं
ठाकरे सेनेत गळती, अमर पाटील, माजी मंत्री खंदारेंचा जय महाराष्ट्र

खा.संजय राऊतांमुळे दक्षिण सोलापुरात विधानसभा मतदारसंघात सांगली पॅटर्न झाला. काँग्रेसच्या परंपरागत मतदारसंघात ठाकरे सेनेने कुरघोडी करून सर्वप्रथम उमेदवार जाहीर केला. महाविकास आघाडीत बिघाडी झाली. आज त्याच मतदारसंघातील ठाकरे सेनेचे उमेदवार तथा जिल्हाप्रमुख अमर पाटील आणि सेनेचे जिल्ह्यातील पहिले आमदार आणि शेवटचे मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांना पक्षातून हाकललं आहे. अमर पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी पुन्हा धनुष्यबाण घेणार आहेत. विशेष म्हणजे खा.राऊत यांचा अमर पाटलांवर मोठा विश्वास देखील होता. तरीही.....
शिवसेनेचे सचिव खा.विनायक राऊत यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कारवाईचे पत्रक जारी केले असून जिल्हाप्रमुख अमर पाटील आणि सहसंपर्क प्रमुख उत्तमप्रकाश खंदारे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या आदेशान्वये पक्षातून हकालपट्टी केली आहे.
अमर पाटील शिवसेनेचे लिंगायत समाजाचे खमके नेतृत्व. त्यांचे वडील रतिकांत पाटलांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघात पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकवला. यंदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रारंभीपासून जोरदार तयारी केली. आठ नऊ महिन्यापूर्वी सोलापूर दौर्यात संजय राऊत यांनी अमर पाटलांचे शक्तीप्रदर्शन आणि संघटनकौशल्य पाहून विधानसभेसाठी तयारी करण्याचे सुचित केले होते. आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले, तत्क्षणीच दक्षिण सोलापूरचा खास दौरा करून त्यांची उमेदवारीही जाहीर केली. त्यावरून मविआत बिघाडी सुरू झाली. काँग्रेसचा हा परंपरागत मतदारसंघ. त्यामुळे काँग्रेसही फटकून राहिली. अमर पाटलांनी भाजपा उमेदवार सुभाष देशमुख यांच्याविरोधात एकाकी लढत देऊन दुसर्या क्रमांकाची मते घेतली. काँग्रेस पाठिंब्याने तुल्यबळ अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी चक्क चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. अशा स्थितीत जिल्हा प्रमुख अमर पाटील यांची हकालपट्टी केल्यामुळे कन्नड भाषिक शिवसैनिकांनाही धक्का बसला आहे. तर अमर पाटलांसह अनेकजण मिंधे सेनेच्या संपर्कात असल्यामुळे कारवाई केल्याचे समजते. दरम्यान संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या दौर्यात काही दिवसांपूर्वी उबाठा सेनेतील खदखद समोर आली होती.
मिंधे गटाशी संधान; म्हणून... : अजय दासरी
पक्षाने केलेली कारवाई योग्यच आहे. या मंडळींचे मिंधे गटाशी संधान होते. त्यामुळे शिवसैनिक संभ्रमात होता. सत्तेतील पदं मिळवण्यासाठी या पदाधिकार्यांचा खटाटोप सुरू होता. त्यामुळे हकालपट्टीची कारवाई योग्यच आहे, असे जिल्हा प्रमुख अजय दासरी म्हणाले.
चोरं अपक्षाला पाठिंबा द्यायचे : ख़ंदारे
राखीव मतदारसंघात चोरं अपक्षाला पाठिंबा द्यायचे. सुशीलकुमार शिंदेंच्या मतदारसंघात रामचंद्र रणशृंगारे यांच्याविरोधात पहिली निवडणूक लढवली. पराभूत झालो. पण 1995 पासून सलग तीन वेळा निवडून आलो. शिवसेनेचा जिल्ह्याचा पहिला आमदार आणि मंत्री. अशी चढती कामगिरी. हकालपट्टीची कारवाई करताना माझं नाव अमर पाटलांशी का जोडलं गेलं? त्यामुळे कारवाईचं पोस्टमार्टम करणार, अशी प्रतिक्रिया उत्तमप्रकाश खंदारे यांनी दिली.
What's Your Reaction?






