फडणवीसांचे लक्ष्य माढा लोकसभा! एमएलसी निवडणुकीत डाव/पेच

रणजीतदादा, रणजीतसिंह निंबाळकर, राम सातपुते, प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, शहाजी पवार, दीपक साळुंके, शशिकांत चव्हाण, दिलीप माने, राजन पाटील, रोहिणी तडवळकर यांच्या नावांची चर्चा असून भाजपा धक्कातंत्र अवलंबतेे. त्यामुळे यापेक्षा वेगळे नाव समोर आले तर...?

May 21, 2026 - 23:34
 0  2
फडणवीसांचे लक्ष्य माढा लोकसभा! एमएलसी निवडणुकीत डाव/पेच

(विजयकुमार पिसे)
विधान परिषद सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी येत्या 25 मे रोजी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असून भाजपाला माढा लोकसभा जिंकायची आहे, तेच लक्ष्य समोर ठेवून उमेदवाराची निवड अपेक्षित असल्याचे मानले जाते. 2024 मध्ये माढा/अकलूजमधून भाजपा विरोधात एल्गार झाला. परिणामी माढ्यासह सोलापूर व धाराशिव, लातूर या लोकसभा मतदारसंघात  हार झाली. त्यामुळे एमएलसी निवडणुकीत काही डाव/पेचसमोर येतील.
सातारचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि माळशिरसचे राम सातपुते यांच्याविषयी अ‍ॅन्टीइन्कम्बसी होती. परंतु ही बाब दुर्लक्षित का झाली. केंद्रीय सहसंघटनमंत्री शिवकुमार यांनी (2024) पंढरपूर येथील बैठकीनंतर याबाबत महाराष्ट्र भाजपाला अवगतही केले होते. 2024 च्या फटक्यामुळे 2029 ची निवडणूक खूप सावधानतेने हाताळणे क्रमप्राप्त असून विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपाठोपाठ पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचीही निवडणूक़ होणार आहे. या सार्‍यांचे प्रभाव क्षेत्र पश्‍चिम महाराष्ट्र आहे. गतवेळी या दोन्ही जागा राष्ट्रवादी व काँग्रेसने जिंकल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक भाजपाकडे बाहुबली बहुमत असले तरी निवडणूक हलक्यात घेतली तर त्याचे परिणाम काय होतात, याचा धडा आहे.
    स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात यापूर्वी याठिकाणी प्रशांत परिचारक (पंढरपूर) यांनी बाजी मारली होती. त्याआधी राष्ट्रवादीचे दीपक साळुंके (सांगोला) यांनीही प्रतिनिधित्व केले होते. तीन वर्षे उशीराने या जागेसाठी निवडणूक़ होत असून परिचारक यांनी भाजपाकडे संख्याबळ नसताना जागा खेचून आणली होती. यापूर्वी 1997 मध्ये सुभाष देशमुख यांनीही कसलेच संख्याबळ नसताना पहिल्यांदा (एकत्रित काँग्रेस होती) चमत्कार घडवला. साळुंके इच्छुक असले तरी त्यांचा पक्ष आणि नेता कोण याची नेमकी स्पष्टता नाही. परिचारक यांना मंगळवेढा/पंढरपूर विधानसभा लढवता येत नाही. लढवली तर जिंकू शकत नाही. 2021/22 ची पोटनिवडणूक आणि 2024 मध्ये समाधान आवताडे येथून पुन्हा आमदार झाले. परिचारकांना मतदारसंघच राहिलेला नाही. त्यांचा पंढरपूर शहर व तालुका विधानसभेच्या तीन मतदारसंघात आणि दोन लोकसभा मतदारसंघात विभागला गेलेला आहे. जातीय समीकरणात ब्राह्मण समाजाचा उमेदवार या भागातून निवडून येणे अवघड आहे, ही बाब फडणवीस आणि गडकरी यांनी लक्षात घेऊन परिचारक यांना विधानसभा लढण्यापासून परावृत्त केले. सुधाकरपंत परिचारकांचा राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सहकार क्षेेत्रात प्रभाव होता. ती पुण्याई पाठिशी असावी, अशी भूमिका आहे. माढा मतदारसंघात मोहिते पाटलांचा प्रभाव आणि विधान परिषद सहज सोपी असली तरी भाजपाला आगामी राजकीय लक्ष्य साधण्यासाठी काही डावपेच आखायचे आहेत.
    प्राप्त माहितीनुसार विधान परिषदेेतून तुकतेच निवृत्त झालेले रणजीतसिंह मोहिते पाटील,माजी खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर,माजी आ.राम सातपुते, प्रशांत परिचारक, राजेंद्र राउत, शहाजी पवार, दीपक साळुंके, शशिकांत चव्हाण, माजी आ.दिलीप माने, राजन पाटील, रोहिणी तडवळकर यांच्या नावांची चर्चा आहे. यापैकीच उमेदवार निश्‍चित होईल, असा दावा आहे., पण भाजपा धक्कातंत्र अवलंबतेे. त्यामुळे यापेक्षा वेगळे नाव समोर आले तर आश्‍चर्य वाटू नये.  

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow