शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्यावर ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या नेत्या राजश्री चव्हाण यांची पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार. सोलापूर जि.प. शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्यावर आदिवासी पारधी समाजातील शिक्षिकेचा लैंगिक छळ व गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला असून, भाजपा नेत्या राजश्री चव्हाण यांनी त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

May 21, 2026 - 00:49
 0  3
शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्यावर ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका सौ. राजश्री चव्हाण यांनी सोलापूर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

तक्रारीनुसार, आदिवासी पारधी समाजातील श्रीमती शीतल बबूशा काळे या वेळापूर येथील इंग्लिश स्कूलमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सन २०२५ पासून प्रलंबित असलेल्या नियमित वेतनश्रेणी प्रस्तावाच्या पाठपुराव्यासाठी त्या शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्याकडे गेल्या असता, त्यांनी कथितरीत्या गैरवर्तन करून शरीरसुखाची मागणी केली, तसेच मानसिक, आर्थिक आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, संबंधित महिलेने या प्रकाराला विरोध केल्यानंतर तिच्याविरोधात खोटा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे आदिवासी पारधी समाजात तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

कठोर कारवाईची मागणी

सचिन जगताप यांना यापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील तत्सम प्रकरणात निलंबित करण्यात आल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. त्यांच्यावर अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तातडीने निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 पोलीस आयुक्तांचे आश्वासन

पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास राज्यभर धरणे, आंदोलन, मोर्चे आणि रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण, शिक्षिका शीतल काळे, चिंटू पवार आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow