गंगाआरतीने काशी जगद्गुरूंच्या श्रावणमास तपोनुष्ठानाची सांगता
काशीपीठ जगद्गुरू डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे आशीवर्चन, खास वाराणसीहून पंडितांना आमंत्रण, मानवजातीच्या कल्याणाची परंपरा, शोभेच्या दारूकामाचा नयनरम्य सोहळा, हजारो भाविकांच्या डोळ्याची पारणे फिटली

(विजयकुमार पिसे)
काशीपीठ जगद्गुरू डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या चौथा श्रावणमास तपोनुष्ठानाची सांगता रविवारी होटगी बृहन्मठात गंगाआरतीने झाली. अशा प्रकारचा सोहळा प्रथमच पार पडला, आणि याची देही याची डोळा, हजारो भाविक उपस्थित राहून धन्य धन्य झाले. गंगाआरतीसाठी खास वाराणसी (काशी) येथून पंडितांना आमंत्रित केले होते. यावेळी जगद्गुरू डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी, मानवधर्मासाठी तपोनुष्ठान केले जाते, असे आशीवर्चन केले.
दरवर्षी श्रावणात होटगी बृहन्मठ येथे योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामी तपानुष्ठान करीत असत. त्यांच्यानंतर ही परंपरा काशी जगद्गुरू डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी कायम ठेवली आहे. यंदाचा सोहळा भव्य दिव्य स्वरूपाचा होता. श्रावणात दररोज पहाटे साडेचारपासून तपोनुष्ठान सोहळा वीरतपस्वी मंदिरात सुरू होता. संपूर्ण श्रावणमासात 350 पेक्षा अधिक़ दांपत्य यात सहभाग झाले होते. आज रविवारी सकाळी वीरतपस्वी मंदिरात पंचमुखी परमेश्वर आणि वीरतपस्वी यांची राजोपचार पूजा झाली. सायंकाळी 4 वाजता माता भगिनी यांनी सामूहिक रूद्रपठण केेले. त्यानंतर सहभागी सर्व दांपत्यांची ओटी भरण्यात आली. सायंकाळी उपस्थित अनेक शिवाचार्य महास्वामी यांनी उपस्थित भाविकांना धर्मोपदेश केला. सायंकाळी 7 वा. तपोनुष्ठान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला.
प्रारंभी श्री श्री श्री 1008 काशीपीठ जगद्गुरू ज्ञानसिंहासनाधिश्वर डॉ.मल्लिकार्जुंन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी आणि ष.ब्र.108 चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य यांची सवाद्य मिरवणूक मठाच्या परिसरातून निघाली. यावेळी धार्मिक विधी पार पडल्यानंतर काशीपीठ जगद्गुरू ज्ञानसिंहासनाधिश्वर डॉ.मल्लिकार्जुंन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी भक्तांचा यथोचित सन्मान केला. तसेच त्यांनी आशीवर्चन केले. दरवर्षी तपोनुष्ठान केले जाते, श्रावणमासातील ही परंपरा कायम ठेवली आहे. मानवजातीच्या कल्याणाचा संकल्प केला जातो. पंचजगद्गुरूंनी मानवजातीच्या हिताचा विचार मांडला. कल्याणाच्या मार्गाने जाणे हे विश्वकल्याण होय, असे काशी जगद्गुरू यांनी आशीवर्चनात सांगून हितापदेश केला. यावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी मनोगतामध्ये जेव्हा जेव्हा धर्म आज्ञा करेल, तेव्हा सत्वरतेने हजर राहीन, सेवा करू, असे सांगितले. माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपण सदैव जगद्गुरूंच्या सान्निध्यातच असतो, त्यांचा कृपाआशीर्वाद नेहमीच मिळतो. त्यांचे तपोनुष्ठान विश्वकल्याणासाठीच असते. त्याचा लाभ आम्हा सर्व भाविकभक्तांना मिळतो, असे नमूद केले.
गंगाआरती सोहळा भव्य दिव्य पार पडला. खास काशीहून पंडितांना आमंत्रित केले होते. मंत्रोच्चाराच्या पठणाने गंगाआरती पार पडली. या सोहळ्याने उपस्थित भाविक कृतकृत्य झाले. तसेच शोभेचे दारूकामाची आतषबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे या सोहळ्यास मातृशक्तीची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला. होटगी बृहन्मठाचे सचिव शांतय्या स्वामी, विश्वस्त रामपुरे, शिवानंद पाटील, जगदीश पाटील, डॉ.राजेंद्र घुली, राजशेखर हिरेहब्बू, प्रकाश वाले, कल्याणराव पाटील, केदार विभुते, राजेंद्र गंगदे, केदार उंबरजे, मल्लिनाथ पाटील, राजू राठी तसेच भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महिला आघाडी प्रमुख विजया वड्डेपल्ली, विहिंप विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे, जिल्हामंत्री संजय जमादार, शिरीष पाटील, श्रावण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
What's Your Reaction?






