सोलापूरमध्ये पती-पत्नीचा रहस्यमय मृत्यू; घरातच आढळले मृतदेह
कलावती नगर परिसरात खळबळ, दोन चिमुकल्या मुली साक्षीदार
सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर शहरात एक धक्कादायक आणि रहस्यमय घटना समोर आली असून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलावती नगर परिसरात राहत्या घरात पती-पत्नीचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
सोमनाथ धानोप्पा पाटील (वय ४०) आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील (वय ३५, रा. कलावती नगर, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. हे दाम्पत्य मूळचे शिरवण (ता. दक्षिण सोलापूर) येथील रहिवासी असून गेल्या काही वर्षांपासून सोलापूर शहरात वास्तव्यास होते.
सकाळी उठले नाहीत, तोंडातून फेस येत असल्याचे निदर्शनास
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी रात्री पती-पत्नी आपल्या दोन मुलींसोबत जेवण करून नेहमीप्रमाणे झोपी गेले होते. मात्र शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास दोघेही बराच वेळ उठत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले. आई-वडील प्रतिसाद देत नसल्याचे पाहून दोन्ही मुली घाबरल्या. त्यांनी तातडीने आपल्या काकांना फोन करून घटनेची माहिती दिली. काकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पती-पत्नीला श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांचाही मृत्यू झाल्याचे घोषित केले.
किराणा दुकान चालवत होते पती-पत्नी
सोमनाथ पाटील यांनी पूर्वी कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला होता. त्यानंतर त्यांनी घरालगतच किराणा दुकान सुरू केले होते. पती-पत्नी दोघे मिळून हे दुकान चालवत असून परिसरात त्यांची ओळख कष्टकरी आणि शांत स्वभावाचे कुटुंब म्हणून होती, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. घटनेच्या वेळी घरात पती-पत्नी व त्यांच्या दोन मुली व्यतिरिक्त अन्य कोणीही उपस्थित नव्हते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
सुसाईड नोट आढळल्याची चर्चा, पोलिसांचा अधिकृत दुजोरा नाही
या प्रकरणात घटनास्थळी एक चिठ्ठी (सुसाईड नोट) आढळल्याची प्राथमिक चर्चा असून मात्र याबाबत पोलिसांनी अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे हा प्रकार आत्महत्येचा आहे की अन्य कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला आहे, याबाबत संभ्रम कायम आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
तपास सुरू, परिसरात शोककळा
या घटनेमुळे कलावती नगर परिसरात शोककळा पसरली आहे. विशेषतः दोन्ही अल्पवयीन मुलींच्या भवितव्याबाबत नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून कौटुंबिक, आर्थिक तसेच इतर सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास सुरू आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासानंतरच या प्रकरणाचे सत्य समोर येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
What's Your Reaction?