"२० वर्षे न्यायासाठी लढलो; अमित शाहांनी दिला आधार, म्हणून शिंदेंसोबत" : ओमराजे निंबाळकर

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याची घोषणा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पराभव, विकासकामांसाठी सत्तेची गरज आणि पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणात न्याय मिळण्याची अपेक्षा ही या निर्णयामागील प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सीबीआय उच्च न्यायालयात अपील करणार असल्याची माहिती देत, न्याय मिळेल या विश्वासामुळेच शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Jun 22, 2026 - 00:08
 0  9
"२० वर्षे न्यायासाठी लढलो; अमित शाहांनी दिला आधार, म्हणून शिंदेंसोबत" : ओमराजे निंबाळकर

धाराशिव |  राज्यातील ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याची घोषणा केली आहे. कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर अनेक कार्यकर्त्यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याने तसेच विकासकामांसाठी सत्तेची गरज असल्याचे सांगत आपण शिंदे गटासोबत काम करण्याचा निर्णय घेतल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

"लोकांच्या कामासाठी आम्ही राजकारणात आलो आहोत. कोणत्याही परिस्थितीत सर्वसामान्यांच्या हितासाठी काम सुरू राहिले पाहिजे. त्यामुळे आम्ही शिवसेना (शिंदे) पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असून यापुढे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करू," असे त्यांनी सांगितले.

पवनराजे हत्या प्रकरणातील न्यायाचा मुद्दाही महत्त्वाचा

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील नुकत्याच लागलेल्या निकालाबाबत नाराजी व्यक्त करताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, "या प्रकरणात आम्हाला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र न्यायालयाचा निकाल आमच्यासाठी दुर्दैवी ठरला. गेल्या वीस वर्षांपासून आम्ही न्यायासाठी लढत आहोत."

त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला. त्यानंतर स्वतः अमित शाह यांच्याशी चर्चा झाली असून सीबीआयने उच्च न्यायालयात अपील करावे, असे निर्देश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

"आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. त्यामुळेच शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय अधिक दृढ झाला," असेही निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अशातच ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow