Election : विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट! काँग्रेस उमेदवार अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल
अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख यांच्या ‘गायब’ झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम. प्रकृती अस्वास्थ्यामुळे नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू.
अमरावती : अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांच्याबाबत मोठी राजकीय खळबळ उडाली होती. गेल्या काही तासांपासून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने आणि त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, देशमुख हे नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्व तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षजीत देशमुख यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ९ जून रोजी नागपूरमधील वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही माहिती घेतली आहे.
दरम्यान, देशमुख यांच्या अनुपस्थितीमुळे अमरावतीतील राजकीय वातावरणात संभ्रम निर्माण झाला होता. निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार अचानक संपर्काबाहेर गेल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चिंता वाढली होती. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते रुग्णालयात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परिस्थिती निवळली.
अमरावती विधान परिषद निवडणुकीत यंदा तिरंगी लढत रंगत आहे. भाजपकडून माजी मंत्री प्रवीण पोटे-पाटील, काँग्रेसकडून हर्षजीत देशमुख, तर वंचित बहुजन आघाडीकडून निलेश विश्वकर्मा निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्यातील राजकीय निरीक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घडलेल्या या घडामोडींमुळे अमरावतीच्या राजकीय वातावरणात आणखी रंगत निर्माण झाली आहे.
What's Your Reaction?