मोदींचा नवा विक्रम; सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा मान
Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी सलग तीन कार्यकाळ पूर्ण करत ४,३९९ दिवस पंतप्रधानपद भूषविले असून जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकला आहे. भारताच्या विकास, अर्थव्यवस्था आणि जागतिक प्रभावातील वाढीमुळे अमेरिका, श्रीलंका, पापुआ न्यू गिनी यांसह अनेक देशांच्या नेत्यांनी मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सलग तीन कार्यकाळ पूर्ण करत त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडीत काढला असून सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविणारे नेते म्हणून नवा इतिहास रचला आहे.
२६ मे २०१४ रोजी प्रथमच पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतलेल्या नरेंद्र मोदी यांनी ४,३९९ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. यापूर्वी हा विक्रम जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर होता. नेहरू ४,३९८ दिवस पंतप्रधानपदी होते.
मोदींच्या या विक्रमी कामगिरीनिमित्त जगभरातील अनेक नेते, राजनैतिक प्रतिनिधी आणि मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याचा, जागतिक प्रभावाचा आणि विकासाच्या गतीचा उल्लेख करत अनेकांनी मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
अमेरिकन नेत्यांकडून अभिनंदन
अमेरिकेतील टेक्सासचे रिपब्लिकन खासदार जॉन कॉर्निन यांनी सोशल मीडियावर मोदी यांचे अभिनंदन करताना भारताच्या आर्थिक प्रगतीत त्यांच्या नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची असल्याचे म्हटले. भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत करण्यातही मोदींचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनीही मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, दशकांतील समर्पण आणि सातत्यपूर्ण जनसेवेचा हा गौरव असल्याचे म्हटले.
मेरी मिलबन यांनी केले विशेष कौतुक
अमेरिकन गायिका मेरी मिलबन यांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रवासाला "इंडियन ड्रीम"चे प्रतीक संबोधले. गुजरातच्या भूमीतून देशाच्या सर्वोच्च पदापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. भारत-अमेरिका संबंध दृढ करण्यात मोदींची भूमिका महत्त्वाची राहिल्याचेही त्यांनी नमूद केले.
श्रीलंका आणि पापुआ न्यू गिनीचाही गौरव
श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायका यांनी पाठविलेल्या संदेशात, मोदींवरील भारतीय जनतेच्या विश्वासाचा हा सन्मान असल्याचे म्हटले. आर्थिक संकटाच्या काळात भारताने श्रीलंकेला दिलेल्या मदतीचाही त्यांनी उल्लेख केला.
पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे मोदी यांना शुभेच्छा देताना त्यांना आदर्श नेतृत्वाचे उदाहरण म्हटले.
मोदींची प्रतिक्रिया
विक्रमाची नोंद झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "जनसेवा हीच सुशासनाची खरी कसोटी आहे. विनम्रता, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेने काम करणाऱ्यालाच जनतेचा विश्वास मिळतो."
What's Your Reaction?