शुगर लॉबीचा डल्ला;१० कारखान्यांकडे २४६ कोटी एफआरपी थकीत
सोलापूर जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची २४६ कोटी रुपयांची एफआरपी थकीत. गोकुळ शुगर आंदोलनानंतरही शेतकऱ्यांचा थकीत रकमेवरून आक्रोश कायम.
- सोलापूर : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची १० कारखान्यांनी एफआरपी तब्बल २४६ कोटींपर्यंत थकवली असून शुगर लॉबी सत्ताधारी असून त्यामुळेच त्यांना शांत झोप येते. गेले १७ दिवस गोकुळ शुगरच्या शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर मागे घेतले. आ. कल्याणशेट्टी यांनी आंदोलकांशी यशस्वी मध्यस्थी केली. दरम्यान तत्पूर्वी आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन यशस्वी केले.
गोकुळ शुगरसह १० साखर कारखान्यांनी एफआरपी अदा केलेली नाही. गाळप हंगाम संपून चार महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असतानाही अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
साखर आयुक्तालयाच्या नोंदीनुसार जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांकडे एफआरपीची मोठी रक्कम थकीत आहे. यापूर्वीही संबंधित कारखान्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेत कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
जिल्ह्यातील हजारो शेतकरी ऊस शेतीवर अवलंबून आहेत. ऊस तोडणी, वाहतूक, मजुरी, खत, बियाणे आणि सिंचन यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करून शेतकरी ऊस उत्पादन घेतात. मात्र हंगाम संपल्यानंतरही एफआरपीची रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. बँकांचे कर्ज, पतसंस्थांचे हप्ते आणि आगामी खरीप हंगामासाठी लागणारा खर्च यामुळे शेतकरी वर्गाची कोंडी झाली आहे.
या स्थितीत काही कारखान्यांनी थकबाकीची अंशतः रक्कम अदा केल्याचा दावा केला आहे, पण अद्याप कोट्यवधी रुपयांची देणी थकीत आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होणार की नाही, असा सवाल आहे.
खालील या १० साखर कारखान्यांनी थकवली एफआरपी.
ही सत्ताधारी पक्षांची असून, शांत झोप लागण्यासाठीच त्यांनी काँग्रेस सोडून भाजप, शिंदे सेना,अजीत दादा गटाशी घरोबा केला आहे. - गोकुळ शुगर अक्कलकोट १३० कोटी
- श्री सिद्धेश्वर सोलापूर ३० कोटी ४४ लाख
- श्री संत दामाजी मंगळवेढा ७०१ लाख
- श्री संत कूर्मदास कुडूवाडी १५ कोटी ९८ लाख
- ओंकार शुगर (मातोश्री लक्ष्मी शुगर) अक्कलकोट ३६७ लाख
- जय हिंद शुगर आचेगाव ७९ लाख
- ओंकार कॉर्पोरेशन (व्ही.पी. शुगर) ११०३ लाख
- भीमा टाकळी सिकंदर ३० कोटी २२ लाख
- आवताडे शुगर मंगळवेढा ३५९ लाख
- कमलाभवानी ग्लोबल (विठ्ठल रिफायनरी) करमाळा १३३९ लाख रुपये
What's Your Reaction?