Tukaram Mundhe : एका कॉलवर तक्रार करा; तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नभेसळविरोधात राज्यभर धडक कारवाई सुरू केली आहे. सहा दिवसांत २०३ छापे, १०२ अटक आणि ६८ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. भेसळीच्या तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक आणि ई-मेल सुविधा सुरू.
मुंबई : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभर अन्नभेसळ आणि प्रतिबंधित पदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. गेल्या सहा दिवसांत राज्यातील २०३ हून अधिक ठिकाणी छापे टाकून १०२ जणांना अटक करण्यात आली असून ६८ दुकाने आणि हॉटेल्सवर कारवाई करत ती सील करण्यात आली आहेत.
मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर "Safe Food, Safe Drugs, Safe Maharashtra" हे ब्रीदवाक्य समोर ठेवत अन्न व औषध सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त दूध, पनीर, मिठाई, खवा आणि इतर खाद्यपदार्थांच्या साठवणूक व विक्रीविरोधात राज्यभर धडक कारवाया सुरू आहेत.
नागरिकांसाठी तक्रार नोंदविण्याची सुविधा
अन्नपदार्थ किंवा औषधांमध्ये भेसळ आढळल्यास नागरिकांना थेट तक्रार करता यावी यासाठी एफडीएने टोल-फ्री क्रमांक आणि ई-मेल सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्राप्त तक्रारींवर तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तक्रारींसाठी संपर्क :
???? टोल-फ्री क्रमांक : 1800 222 365
???? ई-मेल : jc-foodhq@gov.in
धुळ्यात मोठी कारवाई
मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथे मुंबई-आग्रा महामार्गावर मोठी कारवाई करण्यात आली. एफडीएच्या पथकाने सापळा रचून महाराष्ट्रात बंदी असलेला सुमारे १८.५० लाख रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धडाडीचे अधिकारी म्हणून ओळख
तुकाराम मुंढे हे राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेले आयएएस अधिकारी मानले जातात. शिस्तप्रिय, कठोर आणि भ्रष्टाचारविरोधी भूमिकेमुळे त्यांच्या २१ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत तब्बल २५ वेळा बदल्या झाल्या आहेत. मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रशासनातील पारदर्शकता आणि जनहिताला प्राधान्य दिले आहे.
अन्नभेसळविरोधातील सध्याच्या मोहिमेमुळे राज्यभरातील भेसळखोरांमध्ये धास्ती निर्माण झाली असून नागरिकांनीही संशयास्पद अन्नपदार्थांविषयी तक्रारी करण्याचे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे.
What's Your Reaction?