सुनेत्राताई पवारच लाडकी बहीण!

उपमुख्यमंत्रीपदासाठी एक मात्र नाव, पवार परिवार आणि एनसीपीतही एकमत, मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक़

Jan 30, 2026 - 16:08
 0  663
सुनेत्राताई पवारच लाडकी बहीण!

(विजयकुमार पिसे) 

अजितदादांचा वारसा सुनेत्राताई वहिनींकडेच दिला पाहिजे, असा सार्वत्रिक आग्रह सुरू असून पवार परिवार आणि एनसीपीतही एकमत होत आहे. त्यामुळे सुनेत्रा ताई ह्याच *लाडकी बहीण ठरतील. उपमुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांच्याकडे येईल. हा निर्णय झाला तर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री अर्थात राज्याच्या लाडकी बहीण म्हणून शिक्कामोर्तब होणार आहे. 

  ब्रेकींग न्यूज: राष्ट्रवादी दादा गटाच्या आमदारांची तातडीची बैठक मुंबईत शनिवारी बोलावली आहे. या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेतला जाईल, असे समजते.

 *सुनेत्रा ताईच का?* असाही एक प्रश्‍न उपस्थित केला जातो. सुनेत्राताई गेले तीन दशके दादांसोबत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात बरोबरीने कार्यरत आहेत. 2024 मध्ये त्यांनी बारामती लोकसभेची निवडणूक़ नणंद सुप्रिया ताईंच्या विरोधात लढल्या. नंतर राज्यसभेच्या सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची शुक्रवारी दुपारी सव्वातास बैठक झाली आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळही या बैठक़ीला उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजितदादा गट विधीमंडळ पक्षनेते निवडीविषयी चर्चा झाली, असे समजते.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री अजितदादांचे विमान अपघातात निधन झाल्यामुळे पक्षाचे सर्वोच्च पद आणि उपमुख्यमंत्रीपद रिक्त आहे. गुरुवारी अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारानंतर सुनेत्राताईंच्या नावाची चर्चा सुरू असून दादांच्या ज्येष्ठ सहकार्‍यांनीही वहिनींच्या नावाचा आग्रह धरला आहे. दरम्यान काल दादांच्या अंत्यसंस्कारानंतर बारामतीमध्येच ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठक़ीलाही प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ उपस्थित होते. या कालावधीत अन्य आमदारांचाही कौल जाणून घेतला. तेव्हा सर्वांनी सुनेत्राताई यांच्या बाजूनेच कौल दिला. त्यामुळे पुढील आठवड्यात विधीमंडळ नेत्यांची निवड आणि पुढे उपमुख्यमंत्री निवडीचा सोपस्कार पार पडेल, असे मानले जाते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow