भाजपाचे धक्कातंत्र; इच्छुक व समर्थकांनाही धक्का!
संघटनेला वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांना वि.प.वर संधी; कर्जतकर, जठार, नाईक, भेंडे,कोल्हे, सातव यादीत: सोलापूर जिल्ह्यातील अनेकांची घोर निराशा
(विजयकुमार पिसे)
सहा तासापूर्वी सोलापूर दौर्यात मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेची नावं मी नाही, केंद्रीय निवडणूक समिती ठरवते, असे स्पष्ट करून फडणवीस यांनी इच्छुकांना योग्य तो संदेश दिला. तेव्हा अनेकांच्या मनात पाल चुकचुकली. फडणवीस सोलापूरहून मुंबईला रवाना झाले आणि रात्री ९ च्या सुमारास दिल्लीहून विधान परिषदेसाठी नावं जाहीर झाली, तेव्हा इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांची घोर निराशा झाली.
सोलापूरला अनेक वर्षं संघटनमंत्री म्हणून काम करणारे सुनील कर्जतकर, रत्नागिरीतील भाजपाचे जुने ज्येष्ठ नेते प्रमोद जठार, ठाण्यातील माजी नगरसेविका माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. भाजपात सध्या आयारामची चलती (अर्थात नवी भाजपा) आहे, त्या पृष्ठभूमीवर पक्षश्रेष्ठींनी जुन्या निष्ठावंतांना न्याय दिला अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
विधान परिषदेेतून निवृत्त होत असलेले रणजीतसिंह मोहिते पाटील, माजी खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर,माजी आ.रामभाऊ सातपुते,प्रशांत परिचारक,राजेंद्र राऊत, काँग्रेसमधून भाजपात आलेले माजी आ.दिलीप माने,पवार समर्थक राजन पाटील अनगरकर आदी अनेक दिग्गज मंडळींच्या नावांची चर्चा होती. पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात मनपा,जि.प.पं,स. तसेच नगर पालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजपाला एकहाती विजय मिळाला आहे. यामध्ये वरील अनेक नेत्यांचेही योगदान आहे. त्यामुळे निश्चितच सोलापूरला आणखी एक आमदार मिळणार, असा जोरदार दावा समर्थकांचा होता. काही समर्थकांनी सोशल मिडियावर आपल्या नेत्याची पोस्ट देखील व्हायरल केली होती. त्यामुळे दोनच दिवसांपूर्वी एका तालुक्यात अशा पोस्टवरून कार्यकर्त्यांमध्ये *वॉर पेटले. भाजपाच्या धक्कातंत्राने इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांनाही जबर धक्का बसला आहे.
सुनील कर्जतकर २५ वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात अनेक वर्षे संघटनमंत्री म्हणून काम केले आहे. मुंडे, महाजन, गडकरींसमवेत महाराष्ट्रात संघटन उभे करण्यात कर्जतकर यांचेही योगदान आहे. कोकणात नारायण राणे परिवार भाजपात आल्यानंतर जठार यांची सद्दी संपली होती. राणे परिवार खूप पुढे गेला. जठार मागेच पडले होते. उशीराने जठार यांना न्याय मिळाला आहे. माधवी नाईक अनेक वर्षे संघटनेत महिला आघाडीचे काम पाहतात, पण पक्षाने राष्ट्रवादीतून आलेल्या चित्रा वाघ यांना लवकर संधी दिली. माधवीताईंना आता मिळाली. असो. देर आये दुरुस्त... पण भाजपाने निष्ठावंतांची दखल घेतल्याबद्दल पक्षाचे आणि उमेदवारांचेही अभिनंदन...!
What's Your Reaction?